20 January 2019

News Flash

बॅरिस्टरची पदवी धुडकावणारे सावरकर हे पहिले भारतीय – हिमानी सावरकर

मी ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्याचा विचारही करू शकत नाही, असे ठणकावून सांगून बॅरिस्टरची पदवी धुडकावणारे क्रांतिवीर वि.दा. सावरकर हे पहिले भारतीय होते.

| May 27, 2014 08:00 am

मी ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्याचा विचारही करू शकत नाही, असे ठणकावून सांगून बॅरिस्टरची पदवी धुडकावणारे क्रांतिवीर वि.दा. सावरकर हे पहिले भारतीय होते. त्यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, असे प्रतिपादन अभिनव भारत संघटनेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी केले.
संवेदना परिवारतर्फे गांधीसागरजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात ‘क्रांतिकारी सावरकर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी चिखली अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पूर्ती पॉवर अ‍ॅन्ड शुगरचे सहव्यवस्थापकीय संचालक निखिल गडकरी होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजया संस्थेतर्फे वृद्धांसाठी कार्यरत डॉ. शशिकांत रामटेके यांना ‘संवेदना पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ७ हजार २५१ रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कुठल्याही राष्ट्राचा इतिहास हा शाईने नव्हे, रक्ताने लिहिला जातो. भारताचा इतिहास हा क्रांतिकारकांनी सांडवलेल्या रक्तांनीच लिहिला आहे. यामध्ये क्रांतिवीर वि.दा. सावरकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो, असे सांगून हिमानी सावरकर म्हणाल्या, वि.दा. सावरकर यांचे क्रांतिकारी विचार हे विज्ञाननिष्ठा, बुद्धीप्रामाण्यवाद आणि उपयुक्ततावाद या तीन बाबींवर उभारलेले आहेत. बालपणापासूनच त्यांच्यात क्रांतिकारी विचार रुजले होते, हे अनेक उदाहरणावरून स्पष्ट होते. देशाला स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजानंतर सावरकर हे दुसरे होय. छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांनी पूर्णपणे आत्मसात केले होते. त्यांनी जहाजातून घेतलेली उडी संपूर्ण जगात गाजली. या उडीनंतर भारतात काय सुरू आहे, याची माहिती जगाला कळली. यानंतर पुन्हा स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले, असेही त्यांनी सांगितले.
इंग्रजांनी सावरकरांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  त्यांच्यावर जी काही संकटे आलीत, तशी अन्य कुणावरही आली नसतील. स्वातंत्र्यानंतरही देशातील कोडग्या सरकारने द्वेशबुद्धीमुळे त्यांना न्याय दिला नाही. नरेंद्र मोदींचे सरकार सावरकरांच्या देशप्रेमाला निश्चितच न्याय देईल, अशी अपेक्षाही हिमानी सावरकर यांनी व्यक्त केली.
सतीश गुप्ता यांनी आपल्या भाषणात सावरकरांच्या विचारांना समाजमान्यता मिळत असल्याचे सांगून नरेंद्र मोदी यांच्यासारखे तपस्वी मिळाल्याने देशाचे भवितव्य घडल्याशिवाय राहणार नाही, अशी आशा व्यक्त केली. आजच्या तरुणांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत निखिल गडकरी यांनी व्यक्त केले. आनंद देशमुख यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे गीत सादर केले.

First Published on May 27, 2014 8:00 am

Web Title: savarkar was the first indian who didnt accept barrister degree
टॅग Nagpur,Savarkar,Vidarbh