स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली उर्दू आणि हिंदी देशभक्तिपर गीते आता विनाशुल्क डाऊनलोड करता येणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रत्येक गाण्याअगोदर अमिताभ बच्चन यांचे निवेदन आहे. ही गाणी ११ ते १५ ऑगस्ट या कालावधीत डाऊनलोड करता येतील.
सावरकर स्मारकाने उर्दू आणि हिंदी गाणी असलेली ध्वनिफीत ‘हम ही हमारे वाली है’ या नावाने प्रकाशित केली असून ती शंकर महादेवन, सुरेश वाडकर, डॉ. जसविंदर नरुला, साधना सरगम, शान, जावेद अली, वैशाली सामंत, राहुल देशपांडे, स्वप्निल बांदोडकर आणि भरत बलवल्ली यांनी गायली आहेत. गाण्यांचे संगीत संयोजन दिवंगत अनिल मोहिले यांचे असून संगीत भरत बलवल्ली यांचे आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आकाशवाणी किंवा दूरचित्रवाहिन्यांवर स्वातंत्र्यवीरांची मराठी देशभक्तिपर गाणी प्रसारित होत असतात. सावरकरांनी अंदमानात असताना ही उर्दू आणि हिंदी गाणीही लिहिली होती. मराठीतील गाणी अनेकांना माहिती आहेत. पण ही हिंदी व उर्दू गाणी फारशी प्रसिद्ध नाहीत. ही गाणी नव्या पिढीला माहिती व्हावीत आणि त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही गाणी डाऊनलोड करण्यासाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमांतून ही गाणी प्रसारित केली जावीत तसेच सोशल मीडियावरूनही या गाण्यांचा प्रसार करावा, असे आवाहन सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले आहे. ही गाणी डाऊनलोड करण्यासाठी http://www.savarkarsmarak.com या संकेतस्थळा भेट द्या.