‘सवाई’ त सादर होणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक, कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचा सोपा नकाशा, तसेच कलाकारांची माहिती व त्यांची छायाचित्रे आता मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यासाठी ‘टेकडी वेब सोल्युशन्स’ ने अँड्रॉईड तसेच स्मार्टफोनवर वापरता येईल असे एक अॅप्लिकेशन तयार केले आहे.
‘टेकडी वेब सोल्युशन्स’ चे पार्थ लवाटे यांनी ही माहिती दिली. या अॅपच्या साहाय्याने सवाईच्या गडबडीच्या वातावरणातही रसिकांना न गोंधळता सर्व कार्यक्रमांची अचूक माहिती मिळवता येणार आहे. कोणत्याही अँड्रॉईड फोनवरून गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव २०१२’ या नावाने  हे अॅप सहजपणे शोधता येईल आणि ‘इन्स्टॉल’ ही करून घेता येईल. अँड्रॉईड फोनव्यतिरिक्त इतर स्मार्टफोन्सवरही हे अॅप उपलब्ध होऊ शकेल. अॅपल आय पॅड, आयफोन, ब्लॅकबेरी वापरणाऱ्या रसिकांना appsawai2012.tekdi.net या लिंकवर हे अॅप मिळू शकेल. अँड्रॉईड फोनवर अॅप एकदा इन्स्टॉल करून घेतल्यावर ते वापरताना पुन्हा इंटरनेटचा वापर करावा लागणार नाही. इतर स्मार्टफोन्सवर मात्र अॅपच्या लिंकवरून इंटरनेटच्या साहाय्याने त्याचा वापर करता येईल. हे अॅप विनामूल्य आहे.