सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाकडे युवा पिढी आकर्षित व्हावी यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असले तरी अभिजात शास्त्रीय संगीत कलेचा आविष्कार हा या महोत्सवाचा मूळ गाभा कायम ठेवण्याचेच प्रयत्न आहेत, अशी भावना आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी शनिवारी सांगितले.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर मंगळवारपासून (११ डिसेंबर) सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात होत आहे. महोत्सवाचे यंदाचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. हा महोत्सव आता ‘ब्रँड’ होत आहे याचाच अर्थ या महोत्सवाचा दर्जा कायम आहे याची प्रचिती येत आहे. अर्थात याचे सारे श्रेय स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांनाच द्यावे लागेल. त्यांनी सुरू केलेल्या परंपरा पुढे नेण्याचा मानस असल्याचे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
श्रीनिवास जोशी म्हणाले, पंडितजींची गुरुभक्ती, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि संगीताचे वेगळेपण ही तपश्चर्या या महोत्सवाच्या पाठीशी आहे. संगीत जगातील प्रत्येक कलाकाराची या महोत्सवाच्या स्वरमंचावर कला करण्याची तीव्र इच्छा असते. यामागे पंडितजींची महानता सामावलेली आहे. या कलाकारांच्या सहभागामुळे महोत्सवाचे महत्त्व वाढले आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळात पंडितजींनी सहा वर्षांपूर्वी युवा पिढीला सामील करून घेतले. त्यामध्ये मीदेखील होतो. या महोत्सवाचा वाढता पसारा लक्षात घेता यामध्ये योग्य व्यवस्थापनाच्या शिस्तीची जोड देणे आवश्यक असल्याचे ध्यानात आले. त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत असून महोत्सवाचा आत्मा अबाधित राहील याची दक्षता घेतली आहे.
महोत्सवामध्ये युवा पिढीला सहभागी करून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये तिकिटांची उपलब्धता हा त्याचाच एक भाग आहे. शास्त्रीय संगीताच्या मैफलीबरोबरच संगीताविषयीची अधिक माहिती मिळावी यासाठी सवाई गंधर्व स्मारक येथे गेल्या काही वर्षांपासून विविध कलाकारांवरील लघुपटांचा समावेश असलेला ‘षडज्’ आणि वेगवेगळ्या गायक-वादक कलाकारांशी मूलभूत चिंतनात्मक मुलाखतींवर आधारित ‘अंतरंग’ हे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याला महोत्सवाइतकी नाही तरी, संगीताविषयी जाण वाढविण्याची आस असलेले अभ्यासक यावेत हा उद्देश आहे. या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता याला उपस्थित राहणाऱ्यांचे अनुभवविश्व समृद्ध होते असे निश्चितपणे म्हणता येईल. अभिजात संगीताकडे वेगवेगळ्या कला कशा पाहतात, हे समजावे, यासाठी महोत्सवाच्या मंडपात दरवर्षी एक विषय घेऊन छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.
महोत्सव हा कलेचा आविष्कार आहे. त्यामुळे आयोजनामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन कधीच नव्हता. आम्ही धंदेवाईक इव्हेंट ऑर्गनायझर नाही. संगीताचे मर्म, कलाकारांविषयीची आपुलकी आणि त्यांचा आदर सन्मान, महोत्सवाच्या परंपरा आणि चालीरिती याचा परिचय असल्यामुळे महोत्सवाचा व्याप वाढला असला तरी हा गाभा कायम ठेवला जातो. यंदा हीरकमहोत्सवानिमित्त एलईडी तंत्राच्या आधारे रसिकांना दिवसाच्या उजेडामध्येदेखील स्वरमंचावरून सादर होणारा कलाविष्कार सहजपणे दिसू शकेल. स्वरमंचाची सजावट साधीच असली तरी त्यामध्ये वेगळेपण असावे हा प्रयत्न आहे. कला दिग्दर्शक श्याम भूतकर यांच्याकडे या नेपथ्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.