उन्हाळ्याला सुरुवात होताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहेत. त्यामुळे मेडिकल प्रशासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
मेडिकलमधील आकस्मिक विभागाजवळील व परिसरातील थंड प्याऊही गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना एकतर दूर अंतरावरून पाणी आणावे लागते अथवा पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. त्याचा फायदा नेमका मेडिकलमधील स्टॉलचालक उचलत आहेत. रामबागेतील पाण्याच्या टाकीवरून मेडिकलला पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु गेल्या दोन दिवसांपासून हा पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाणी पुरवठा नेमका का बंद करण्यात आला, याची स्पष्ट माहिती कुणीही देत नाही. परिसरात एक खासगी तत्त्वावर स्वच्छतागृह चालवले जाते. तेथे चोवीस तास पाणी उपलब्ध असते.
मेडिकलमधील विहिरीतील पाण्याचा पुरवठा सध्या कुलरसाठी करण्यात येत आहे. येथे असलेल्या पाणी टंचाईमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना घरूनच पाणी न्यावे लागत आहे. मेडिकलमध्ये येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचारी असा एकूण १० हजार नगरिकांचा मेडिकलमध्ये दररोज वावर असतो. एवढय़ा नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. परंतु ही व्यवस्था पूर्ण करण्यास मेडिकलचे प्रशासन अद्यापही यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे उन्हाळ्यातच ही समस्या निर्माण होते. पाणीच नसल्याने येथील स्वच्छतागृह घाणीने माखलेले आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना सोयीपेक्षा गैरसोयींनाच अधिक तोंड द्यावे लागत आहे. लवकरात लवकर पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी येथे येणारे नागरिक करीत आहेत.