दारणा धरणातून तातडीने काही प्रमाणात पाणी सोडण्याचे तसेच पाच जून रोजी असणारे आवर्तन एक जून रोजी देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने देवळाली कॅम्प परिसरास भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर तूर्तास तोडगा काढण्यात आला आहे.
काही दिवसांपासून दारणा धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले. त्यातच पुढील पाण्याचे आवर्तन पाच जून रोजी असल्याने तब्बल १५ दिवस देवळाली, भगूर व लष्करी केंद्रास पाणी टंचाई भासणार होती. छावणी मंडळ प्रशासनाने याबाबतची पूर्व सूचना स्थानिक नागरिकांना अगोदरच दिली होती. स्थानिक नगरसेवकांनी टंचाईसंदर्भात खा. हेमंत गोडसे यांना माहिती दिल्यानंतर दिल्लीहून परतताच खा. गोडसे यांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांची भेट घेतली.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते हेही उपस्थित होते. खासदारांसमवेत छावणी मंडळाच्या उपाध्यक्षा सुरेखा गोडसे, नगरसेवक दिनकर पाळदे, सुरेश कदम, तानाजी करंजकर, सुधाकर गोडसे आदी उपस्थित होते.
तातडीने काही प्रमाणात धरणातून पाणी सोडण्याचे आदेश सिंचन विभागास देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तसेच पाण्याचे पुढील आवर्तन एक जून रोजी सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवक बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, कावेरी कासार, सुनंदा कदम यांनी पाणी टंचाईवर उपाय शोधण्याची मागणी केली होती.