दहावीचा निकाल आज लागेल..उद्या लागेल.. अशी प्रतीक्षा करीत असलेल्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता आहे. निकालाची तारीख केव्हा जाहीर होते, याकडे विद्याथ्यार्ंचे डोळे लागले आहेत. मंडळाने अधिकृत तारीख घोषित केली नसली तरी १६ किंवा १७ जूनला निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावर्षी प्रवेशपत्रामुळे मोठय़ा प्रमाणात गोंधळ झाला होता .यामुळे निकालाला उशी होत आहे.
बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडय़ात ऑनलाईन घोषित केल्यानंतर दहावीचा निकालसुद्धा आठ-दहा दिवसात लागेल या आशेने अनेक विद्यार्थी गेल्या पाच सहा दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकालाबाबत शाळांमध्ये, प्रसार माध्यामांकडे सारखी विचारपूस करीत निकाल केव्हा जाहीर होणार म्हणून विचारणी केली जात आहे. दहावीचे वर्ष तसे महत्त्वाचे वर्ष असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांंना व त्यांच्या पालकांना फारच उत्सुकता आहे. मुलगा पास होईल की नाही, त्याला किती टक्के गुण मिळतील, चांगले गुण मिळाले तर कोणत्या महाविद्यालयात प्रवेश देणे योग्य राहील किंवा कमी गुण मिळाले तर करावे, महाविद्यालयात तो कोणत्या क्रमांकावर राहील, अशा अनेक प्रश्नांबाबत पालक विचार करीत आहे. कमी गुण मिळाले तर आईवडील काय म्हणतील?, चांगले गुण मिळाले तर आपल्याला आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का? अशा अनेक प्रश्नाबाबत विद्यार्थी चिंता करीत आहेत. काही विद्याथ्यार्ंनी निकालाचा फारच ताण घेतला आहे त्यामुळे त्यांना केव्हा एकदा निकाल लागतो, असे झाले आहे.
बारावीचा निकाल घोषित झाल्यानंतर शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सुद्धा लवकरच ऑनलाईन पद्धतीने घोषित केला जाईल असे जाहीर केले होते. शिवाय शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल प्रारंभी १० किंवा ११ जूनला लागणारअसल्याचे सांगितले. जूनचा दुसरा आठवडा संपत तरी निकालाची तारीख जाहीर केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाविषयी विद्यार्थ्यांंची उत्सुकता जास्तच वाढली आहे. विदर्भात येत्या २७ जूनपासून शाळा सुरू होणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रात १३ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. सीबीएससीचे दहावीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असून त्यांच्या प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू झाले आहे त्यामुळे राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल लवकर जाहीर का केला जात नाही ? अशी विचारणा अनेक पालक व विद्यार्थी करीत आहेत.
यावेळी बारावीप्रमाणेच दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात येणार असल्यामुळे यावर्षी गुणवत्ता यादी राहणार नाही त्यामुळे गुणवंत विद्याथ्यार्ंना त्याचे फारसे आकर्षण राहिलेले नाही.
दहावीचा निकाल लागताच केंद्रीय प्रवेश पद्धतीने प्रवेश सुरू होणार असले तरी यावेळी काही निवडक केंद्रावर प्रवेश अर्ज न मिळता ज्या शाळेत विद्यार्थी आहे त्या शाळेतून त्यांना अकरावीचा प्रवेश अर्ज मिळणार आहे. त्यामुळे दरवर्षी होणारी पायपीट आणि रांगेत उभे राहण्याचा मनस्ताप कमी होणार आहे. महात्मा गांधी सेंटेनियल हायस्कूलमध्ये केंद्रीय प्रवेश समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विज्ञानासह वाणिज्य, कला शाखेचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीने होणार आहेत.