स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही शासकीय नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमातीचा मोठा अनुशेष असणे ही शोकांतिकाच असल्याची खंत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केली. या परिसरातील आदिवासींच्या घराघरांत शिक्षण पोहोचवण्याचे काम प्रतिष्ठानने करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यशवंतराव भांगरे आदिवासी विकास प्रतिष्ठानच्या वतीने कै. राजाराम भांगरे यांच्या स्मरणार्थ आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे सचिव मंगलदास भवारी यांना समाजरत्न, माजी गटशिक्षणाधिकारी मारुती लांघी यांनी समाजभूषण तर भाऊसाहेब चासकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार वाकचौरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रेमानंद रूपवते व माजी उपसभापती यमाजी लहामटे यांच्या हस्ते शेंडी येथे झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक भांगरे होते. स्वातंत्र्यानंतरही आदिवासींच्या विकासासाठी पाहिजे तसे प्रयत्न झाले नाहीत. संसदेच्या अनुसूचित जातिजमाती समितीचा अध्यक्ष या नात्याने काम करताना शासकीय नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जातीचे प्रमाण तुलनेने चांगले असले तरी या जमातींचा मोठा बॅकलॉग प्रत्येक संवर्गात शिल्लक असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे. अनुसूचित जमातीचा नोकऱ्यांमध्ये मोठा अनुशेष शिल्लक राहणे ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले. यशवंतराव भांगरे यांच्या आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. रूपवते यांनी यशवंतराव व राजाराम भांगरे हे दोघे माणसांचे गाणे गाणारे बंधू होते. स्वत:चे प्रश्न बाजूला ठेवून समाजासाठी काम करणाऱ्या अशा माणसांमुळेच समाज चालत असतो असे ते म्हणाले.
लहामटे तसेच तीनही पुरस्कारार्थीनी या वेळी मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सोनाली भांगरे हिने मानपत्राचे वाचन केले. रावसाहेब शेळके यांनी सूत्रसंचालन केले. विजय भांगरे यांनी आभार मानले.