उरण तालुक्यातील झपाटय़ाने होत असलेल्या विकासासोबत नागरीकरणदेखील मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. या ठिकाणी गावाचे रूपडे पालटत त्यांना शहरीपणा आलेला आहे. ग्रामस्थांचे राहणीमान उंचावत आहे. विकासाचे विविध टप्पे गाठणारे उरणमधील एक अविभाज्य घटक असलेले कोप्रोली आदिवासी पाडय़ातील आदिवासी मात्र आजही विकासापासून कोसो दूर आहेत. या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडलेले असल्याने येथील विद्यार्थ्यांना एका मोडक्या घरातील काळोखात भरणाऱ्या शाळेत अक्षरे गिरवावी लागत आहेत.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या पाडय़ातील विद्यार्थ्यांच्या नशिबी शासकीय यंत्रणांच्या करंटेपणामुळे आजही अंधार कायम आहे. याच अंधारलेल्या वाटेवर पाडय़ातील सोमनाथसारखे विद्यार्थी यश संपादन करीत इतर विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरत आहेत. दहावीत ५७ टक्के गुण मिळवत पहिला दहावी पास विद्यार्थी होण्याच्या मान त्याने मिळवला आहे. त्याच्या या यशाचा आदर्श घेत अनेक विद्यार्थी साक्षरतेच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. मात्र त्यांना शासकीय यंत्रणेच्या गलथान कारभाराचे गतिरोधक पार करावे लागत आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेले प्राथमिक शाळेच्या इमारतीचे काम गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे वर्ग भरवायचे कोठे, हा प्रश्न पुढे आल्याने पाडय़ातील एका ग्रामस्थाने घेतलेल्या पुढाकाराने त्याच्या घरात शाळा सुरू करण्यात आली. मात्र या ठिकाणी विजेची सुविधा नसल्याने अंधारात शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. याच अंधारातून शिक्षणाच्या माध्यमातून मोठय़ा जिद्दीने विद्यार्थी उद्याच्या प्रकाशवाटा शोधत आहेत.
मुख्याधापक निलंबित
आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची इच्छा असून त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात उरण पंचायत समिती कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार शाळेचे बांधकाम सर्वशिक्षण अभियानाअंतर्गत केले जात असून शाळेसाठी उपलब्ध झालेल्या निधीचा वापर वेळेत न झाल्याने येथील मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.