नववीत शिकणा-या पिंपळगावरोठा येथील पूजा वसंत माने या पंधरावर्षीय विद्यार्थिनीने बुधवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पूजा ही पिंपळगावरोठा येथील जय मल्हार विद्यालयात शिकत होती. हुशार विद्यार्थिनी असाच तिचा लौकिक होता. बुधवारी दुपारी डोके दुखते आहे असे सांगून ती शाळेतून घरी गेली. घरी पोहोचल्यानंतर ओढणीच्या साहाय्याने घराच्या छतास गळफास घेऊन आत्महत्या केली. घरची मंडळी सायंकाळी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पूजा हिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात एका विद्यार्थिनीच्या नावाचा उल्लेख असून तिच्या आत्महत्येविषयी तिच्या शाळेत माहिती उपलब्ध होऊ शकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.