इमारतीचा पुनर्विकास सुरू असल्याने ठाण्यातील महात्मा गांधी रस्त्यावरील नौपाडा पोलीस ठाण्यासमोरील महापालिकेची शाळा सध्या चक्क कंटेनरमध्ये भरत आहे. येथील कृष्णनिवास ही मोडकळीस आलेली इमारत आता नव्याने बांधली जात आहे.
त्यामुळे येथील रहिवाशांनी तात्पुरत्या स्वरूपात अन्यत्र स्थलांतर केले आहे. शाळा लांब हलविणे शक्य नव्हते. कारण या परिसरातील पालिकेची ही एकमेव गुजराती माध्यमाची शाळा आहे.
सध्या या शाळेत पहिली ते सातवीचे अवघे ३२ विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी एकेकाळी या शाळेचा पाच-सहाशेचा पट होता. इंग्रजी माध्यमाचे माहात्म्य वाढल्याने दिवसेंदिवस या शाळेचा पट कमी कमी होत गेला. मात्र तरीही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील गुजराती मुलांना या शाळेशिवाय जवळपास दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे रघुनाथनगर, लुईसवाडी ते अगदी कोपरी परिसरातून येथे विद्यार्थी शिकायला येतात.
महापालिकेच्या या शाळा क्र. २० चे नाव लिलावती ठाकोरदास ठाणावाला असून १९४७ पासून ती येथे भरते. महापालिकेच्या गुजराती माध्यमाच्या एकूण पाच शाळा आहेत. कृष्णा निवासमध्ये या शाळेचे दोनच वर्ग भरत होते. पट जास्त असल्याने विष्णूनगरमधील शाळा क्र. १९ मध्ये तीन वर्ग भरायचे. पूर्वी दोन सकाळ-दुपारचे दोन वर्ग भरत होते. आता विद्यार्थीसंख्या मोजकीच असल्याने फक्त दुपारचे वर्ग भरतात. कंटेनरच्या या शाळेत विद्यार्थी खूश आहेत. कारण त्यास पुरेशी जागा आणि सर्व सुविधा आहेत. येथे मुख्याध्यापकांसह तीन शिक्षक कार्यरत आहेत.