दिवाळीनंतरचे सत्र म्हणजे सहल, स्नेहसंमेलन आणि क्रीडास्पर्धा यासारख्या विद्यार्थीप्रिय उपक्रमांचे दिवस असतात, या दिवसांत शाळांमधील माहोल या गोष्टींनी झपाटलेला असतो. अलीकडे मात्र, या सर्व उपक्रमांना एखाद्या ‘इव्हेन्ट’चे रूप प्राप्त होत आहे. विद्यार्थ्यांची सहल ‘रिसॉर्ट’ने नेण्यात आणि कसबी नाटय़ अथवा नृत्य कलावंतांकडे स्नेहसंमेलनाची सूत्रे सुपूर्द करण्यात मुंबईतील उच्चभ्रू परिसरांतील अनेक नामांकित शाळा इतिकर्तव्यता मानू लागल्या आहेत. या सगळ्यात मुलाच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा, या दृष्टीने उपक्रमांचे आयोजन असावे, या शिक्षणाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे.
वर्षभर कुठल्या ना कुठल्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जातेच, त्यामुळे डिसेंबर-जानेवारीत शाळेतर्फे मुलांची सहल ही सर्रास मुंबईनजिकच्या कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये नेली जाते. ती नेताना मुलं आणि शिक्षकांचे प्रमाण, तिथल्या राइडस्वर खेळताना मुलांची सुरक्षितता या सर्व मुद्दय़ांकडे अनेकदा शाळा व्यवस्थापनाचा काणाडोळा होत असल्याची तक्रार पालकवर्ग करताना दिसतो. एखादा अपघात घडल्यानंतरच या प्रकाराची वाच्यता होऊन साऱ्यांचे लक्ष वेधले जाईल का अथवा मुलांना मौजमजा करायला रिसॉर्टमध्ये न्यायचेच असेल, तर पालक नेतील, शाळांनी सहल म्हणून रिसॉर्टला नेण्यास पुढाकार घेण्यात आणखी काही आर्थिक गिमिक तर नसते ना, असे मुद्दे सहलीसंदर्भात काही पालकांनी यासंदर्भात उपस्थित केले. स्नेहसंमेलनाचे तर मेगा इव्हेन्ट शाळा-शाळांमध्ये होऊ लागले आहेत. सुनियोजित, शिस्तबद्ध आणि साचेबद्ध रेकॉर्ड डान्सेसमध्ये पूर्वीच्या शालेय स्नेहसंमेलनांतील शिक्षक-पालकवर्गाची त्रेधातिरपिट, गडबडघाई आणि त्यात येणारी धम्माल कुठेतरी हरवू लागलीय. मुलं आणि शिक्षकांनी एकत्र येऊन बसवलेली नाटुकली अथवा नृत्य आज कालबाह्य़ ठरतंय आणि मग व्यावसायिक कलावंत म्हणून मान्यता पावलेले तथाकथित नृत्य आणि नाटय़ कलावंत मोठी बिदागी पदरात पाडून मुलांचे कार्यक्रम बसविण्यासाठी शाळांकडे वळू लागले आहेत. यामुळे मुलांवर मेहनत घेण्याचा शिक्षकांच्या डोक्याला होणारा तापही कमी झालाय आणि सारंच कसं शिस्तीचं म्हणत पालकवर्गाच्या टाळ्या अशा कार्यक्रमांना मिळू लागल्या आहेत.         
काही शाळा अशा आहेत, ज्या स्नेहसंमेलनातील कार्यक्रम मुलं आणि शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच व्हावेत, आणि मुलांच्या अभिव्यक्तीला यात कमाल वाव मिळावा, यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना सध्या अनेक शाळांमध्ये सुरू असलेल्या स्नेहसंमेलनाचे आऊटसोर्सिग करण्यासंबंधात काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
एखाद्या विशिष्ट विषयातील अधिक कल, बुद्धिमत्ता, आवड ही प्रत्येकात असते, अशा वेळेस मुलाची ‘ती’ गोष्ट टिपली जाणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्यासाठी वाव त्याला मिळायला हवा आणि या संदर्भात शिक्षकाने फॅसिलिटेटरची भूमिका निभावायला हवी. स्नेहसंमेलन अथवा सहल या उपक्रमांकडे या दृष्टीतून बघणे अत्यावश्यक ठरते. स्नेहसंमेलनात खर्चिकपणा, शो ऑफ करण्यात अर्थ नसतो. सहल आयोजित करतानाही मुलाचा बाहेरच्या जगाशी आणि तेथील जगण्याशी थेट संपर्क यायला हवा. मुळात सहल वा स्नेहसंमेलन हे अभ्यासेतर उपक्रम नाहीत, तर आपल्या शालेय अभ्यासक्रमात याचा अंतर्भाव केलेला आहे. हे लक्षात घेत शाळांनी हे उपक्रम राबवावेत. सहल वा स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम करण्यामागचे हेतू शाळांनी निश्चित करावेत. मुलांच्या वेगवेगळ्या पैलुंचा शोध घेण्यासाठी हे कार्यक्रम उपयुक्त ठरतात, हे शाळांनी जाणायला हवे.
–    गौरी देशमुख, माजी मुख्याध्यापिका अक्षरनंदन, पुणे

शाळेत आयोजित केल्या जाणाऱ्या अभ्यासेतर उपक्रमांचे आयोजन करताना त्यामागचा प्रमुख हेतू हा मुलांच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा, असा असायला हवा. संस्थाचालक आणि शाळांनीही त्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी करायला हवी. आमच्या शाळेत स्नेहसंमेलनाची तयारी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रितपणे करतात. या कार्यक्रमांमध्ये रेकॉर्ड डान्सला पूर्णपणे अटकाव असतो आणि साहित्य, सांस्कृतिक विषयांसंदर्भातील ‘संकल्पना’ निश्चित करून त्याबरहुकूम गाणं, अभिनय अथवा एकपात्री प्रयोग अशा कार्यक्रमाची मांडणी केली जाते. आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात असाही एक कार्यक्रम असतो, जो शिक्षकवर्ग सादर करतात. सहल ही शैक्षणिक अथवा मुलांच्या ज्ञानात भर घालणारी  असावी, याकडे शाळा लक्ष पुरवते.
  – मिलिंद चिंदरकर, मुख्याध्यापक, महात्मा गांधी शाळा, वांद्रे

स्नेहसंमेलन या शब्दांतूनच खरे तर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्ग यांनी एकत्र आणणारा कार्यक्रम हा अर्थ ध्वनित होतो. स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम हे विद्यार्थ्यांच्या वयानुरूप असायला हवेत. आमच्या शाळेत खर्चाला पुरता फाटा देत सूत्रसंचालन, संहिता लेखन, अभिनय या साऱ्या जबाबदाऱ्या विद्यार्थी पेलतात आणि त्यांना हवी तिथे मदत करायला आमचे शिक्षक असतात. सहलीत मजेचा भाग जरी असला तरी त्याचे आयोजन करताना विद्यार्थ्यांना नवीन बघण्याची, शिकण्याची ही संधी असते, याचा विसर पडता कामा नये. उलटपक्षी, हा अनुभव विद्यार्थ्यांची समज अथवा दृष्टिकोन कसा विकसित करेल, या दृष्टीने सहलीचे आयोजन करायला हवे.
    
-विनोदिनी काळगी, मुख्याध्यापिका, आनंदनिकेतन, नाशिक