उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सुरक्षिततेसाठी कायद्याचा बडगा उगारून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करताच, रिक्षाचालकांनी मनमानी करत भाडेवाढीचे हत्यार उपसले आहे. काही रिक्षाचालकांनी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच चालू फेब्रुवारीपासून जवळपास दुप्पट भाडेवाढ केली आहे. या चालकांनी रिक्षातील विद्यार्थिसंख्या कमी केल्याचा बहाणा त्यासाठी पुढे केला आहे. प्रत्यक्षात मात्र नियमापेक्षा अधिकच विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे.
रिक्षात मोठय़ा संख्येने, अक्षरश: कोंबलेले व गुदमरलेले विद्यार्थी, बाहेर लोंबकळणारी त्यांची दप्तरे यामुळे विद्यार्थ्यांसाठी रिक्षामधील वाहतूक धोकादायक झाली आहे. त्याला आरटीओ विभागाने शिस्त लावण्याचा प्रयत्न करताच रिक्षाचालकांनी मागील, जानेवारी महिन्यात संपाचे हत्यार उपसले. चार दिवस वाहतूक बंद ठेवली. परंतु प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे रिक्षाचालकांना अखेर माघार घ्यावी लागली. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक पुन्हा सुरू झाली.
रिक्षाचालकांनी एका रिक्षात किमान ८ ते १० विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी मागितली होती. परंतु आरटीओने नियमानुसार ५ विद्यार्थ्यांनाच परवानगी राहील, असे स्पष्ट केले. काही दिवस वाहतूक सुरळीत राहिली. चालकांनी रिक्षातील मुले कमी केल्याचा बहाणा केला व सध्याही ८ ते १० विद्यार्थ्यांचीच वाहतूक बेकायदा सुरू आहे. असे असतानाही काही रिक्षाचालकांनी मनमानी करत लगेच भाडेवाढ केली. ही भाडेवाढ जवळपास दुप्पट करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी रिक्षा वाहतूक कृती समितीने हा विषय अजेंडय़ावर घेतला नसतानाही काहींनी ही भाडेवाढ केली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातून सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलसाठी पूर्वी ४०० रुपये आकारले जात होते, ते आता ७०० रुपये करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच रिक्षाचालकांनी भाडेवाढ केलेली होती. ते संपण्यापूर्वीच पुन्हा दुसऱ्यांदा, तीही जवळपास दुपटीने वाढ केली आहे.
संघटना अनभिज्ञ
भाडेवाढीसंदर्भात रिक्षा पंचायतचे जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी भाडेवाढीचा निर्णय झालेला नाही व कोणी भाडेवाढ केली असेल तर त्याची माहिती संघटनेस नाही, असे स्पष्ट केले. सरचिटणीस ज्ञानेश्वर थोरात यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी भाडेवाढ करणे चुकीचे असल्याचे सांगितले. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर केवळ ५ विद्यार्थ्यांची वाहतूक करून, नवी भाडेवाढ लागू करण्याचा संघटनेचा विचार आहे. अचानकपणे मध्येच वाढ करता येणार नाही, दरवाढ लागू करतानाही ती नियमाप्रमाणे लागू केली जाईल, असे स्पष्ट केले.
 तक्रार केल्यास कारवाई!
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अवाजवी भाडेबद्दल पालकांनी तक्रार केल्यास रिक्षाचालकांवर निश्चित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. एका रिक्षात केवळ ५ विद्यार्थ्यांना परवानगी आहे, चालकांना कंत्राटी पद्धतीने रिक्षातून वाहतूक करता येणार नाही, विद्यार्थ्यांची ‘शेअर’ तत्त्वावर ने-आण केली जाऊ शकते. त्यासाठी १.६ किमीसाठी १३ रु. अधिक २० टक्के सानुग्रह (इन्सेंटिव्ह) असा एकूण १५ रु. ६० पैसे, प्रती विद्यार्थी व त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ८ रु. असा दर जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीने ठरवला आहे. शाळा स्तरावरील परिवहन समितीसही या आधारावर दर ठरवण्याचे अधिकार आहेत, असेही त्यांनी सांगितले.