मुलांचा सर्वागीण विकास या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी शहरी भागांत विविध छंदवर्ग, शिबिरे सातत्याने सुरू असतात. ग्रामीण भागांत मात्र मुलांचे शिक्षण हा मुद्दा तसा गौण ठरतो. या पाश्र्वभूमीवर, येथील युवा मित्र संस्थेने ‘वीक एण्ड स्कूल’च्या माध्यमातून ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी अवांतर शिक्षण देणारी अनोखी शाळा सुरू केली आहे. या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या माध्यमातून आजवर १००हून अधिक विद्यार्थ्यांनी अनोख्या शाळेत सहभाग नोंदविला आहे. युवा अभियानच्या माध्यमातून विविध उपक्रम सध्या जिल्ह्य़ात सुरू आहेत. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘क्षणोक्षणी शिक्षण’ या हेतूने १२ ते १५ वयोगटांतील मुलांना लक्ष्य गट करत तीन वर्षांपूर्वी संस्थेने ‘वीक एण्ड स्कूल’ची सुरुवात केली. अभ्यास आणि रट्टा या संकल्पनेला फाटा देत महिन्यातून दुसरा व चौथा शनिवार आणि रविवार असे या निवासी शाळेचे स्वरूप आहे. मुलांना अभ्यासाबरोबर श्रमाचे महत्त्व समजणे, स्वत:च्या जबाबादारीचे भान यावर भर देत विविध सत्रांची आखणी करण्यात आली. शैक्षणिक अभ्यासक्रमाची चौकट ओलांडत ‘एक आठवडा-एक विषय’ यानुसार खास अभ्यासाची दिनदर्शिका तयार करण्यात आली. त्यात ऋतू आणि निसर्गचक्रानुसार उपक्रमांची आखणी करण्यात आली. मुलांच्या आवडीनिवडी, छंद कलागुण, व्यक्तिमत्त्व विकास याबरोबर त्यांचे सामाजिक आकलन वाढेल याकडे लक्ष वेधण्यात आले. युवा मित्रच्या मनीषा मालपाठक यांनी ही संकल्पना सविस्तरपणे अधोरेखित केली. विषयाची निवड करताना हस्तकला, चित्रकला, मातीकाम, टाकाऊतून टिकाऊ या कला माध्यमांचा पुरेपूर वापर करत मुलांच्या सर्जनतेला वाव देण्यात आला. साहित्याशी परिचय व्हावा यासाठी कविता कशी करायची, तिला चाल कशी लावणार आदी माध्यमांतून ‘कविता’ शिकवण्यात आली. जलतरंगापासून विविध प्रकारची वाद्ये, ती कशी वाजवायची याबद्दल स्वतंत्र वर्ग भरविण्यात आला. ३० विद्यार्थ्यांना प्रवेश अट आजवर कायम राहिली आहे. संस्थेच्या मित्रांगण कॅम्प्सवर ही शाळा भरते. या शाळेचे वैशिष्टय़ म्हणजे शाळेत शिक्षक नाही, परीक्षा नाही फक्त मनासारखे शिक्षण आहे. शाळाबाहेरील शिक्षणाच्या या प्रक्रियेत सर्वागीण विकासाच्या सर्व जागा आणि संधी मुलांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात खेळघर, शेती-शिक्षण, मातीकाम, कोलाजकाम, अनुभव सहली, साधनांचा वापर करून मुलांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रयत्न करण्यात आले. हे करताना मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता भासू नये यासाठी इंग्रजी संभाषण वर्ग आणि संगणकीय साक्षरता याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले आहे. इंग्रजी आणि मातृभाषा मराठी असली तरी अभिव्यक्तीत मागे पडली म्हणून या दोन विषयांचे व्याकरण व ज्ञान वाढावे यासाठी विशेष सत्र आयोजिले जाते. त्यात मुलांना खुलेआम बोलण्यास प्रवृत्त केले जाते. मुले बाहेरच्या जगाशी जोडली जावीत यासाठी तालुका परिसरातील तहसीलदार, पोलीस स्थानक, पोस्ट ऑफिस यासह विविध शासकीय कार्यालयांना भेट देत तेथील कामे समजावून दिली जातात. ‘स्मशानभूमी’ला भेट सारखी सहल आयोजित करत मुलांच्या मनात असलेली अनामिक भीती काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र हे करताना मुलांची गोंधळमस्ती गृहीत धरत काही नियम व शिक्षा हे मुलांनी स्वत:च तयार केल्या आहेत. कुठल्याही प्रकारची शारीरिक इजा न देता तसेच मानसिक त्रास न देता मुलांना शिक्षेच्या माध्यमातून चूक सुधारण्यास संधी दिली जाते. नियमांच्या बाबतीत तसेच यातून ‘चूक आणि नियम’ असा अलिखित रिवाज सुरू झालेला आहे.या सर्व प्रक्रियेत सहभागी झाल्यावर आपल्यात नेमका काय बदल झाला, याची परीक्षा म्हणजे ‘आत्मपरीक्षण’. यासाठी मुलांकडून वैयक्तिक वा घरगुती, रोजच्या जीवनातील कामांची २० गोष्टींची यादी प्रत्येकाला देण्यात आली. यापैकी किती गोष्टी विद्यार्थी स्वत: करू शकतात, किती गोष्टींसाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो याचे आत्मपरीक्षण करत अधिकाधिक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचा असे परीक्षेचे स्वरूप असल्याने मुलांना त्याचा लाभ होत असल्याचे मालपाठक यांनी सांगितले.