मराठवाडय़ाला पाणीटंचाईचा फटका
मराठवाडय़ातील तीव्र पाणीटंचाईचा फटका विकासकामांवर होऊ लागला आहे. औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील शाळा, अंगणवाडी व घरकुलांची कामे पाण्याअभावी रखडली आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ात शाळेची १२, तर अंगणवाडीची १९३ कामे रखडली आहेत. अंगणवाडीच्या एका इमारतीस ४ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर आहे. मराठवाडय़ातील ५९३ अंगणवाडय़ांची बांधकामे या वर्षांत पूर्ण होणार नाहीत.
पाणीच नसल्याने बांधकामांना स्थगिती द्यावी, असे आदेश उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत. उस्मानाबाद शहरात नगरपालिकेने बांधकाम परवाने देणेही बंद केले आहे. जालना व बीड येथेही अशीच स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील शाळा, अंगणवाडय़ा व घरकुलांची कामे रखडली आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दारिद्रय़रेषेखालील कुटुंबीयांसाठी बांधल्या जाणाऱ्या घरकुल योजनांसाठीचा पहिला हप्ता नुकताच जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला. टंचाईमुळे ही सर्व कामे होण्याची शक्यता नाहीच, असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सांगतात. औरंगाबाद जिल्ह्य़ात १२, जालना ४२, बीड १३२, उस्मानाबाद २६ शाळांचे प्रस्ताव या वर्षी मान्य करण्यात आले. नवीन वर्गखोल्या व शाळा बांधकामासाठी सर्वशिक्षा अभियान व शिक्षण विभागाच्या नियोजनातून तरतूदही करण्यात आली. मात्र, ही कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. अशीच अवस्था अंगणवाडी बांधकामांची आहे. या वर्षांत औरंगाबादमध्ये १९३, जालना १७३, बीड १२७ व  उस्मानाबादमध्ये १०० ठिकाणी अंगणवाडी इमारतींची आवश्यकता आहे. इमारतींसाठी निधीही देण्यात आला. मात्र, पाण्याअभावी बांधकाम होणे शक्य नाही. स्वच्छतागृहांच्या योजनेचीही अशीच अवस्था आहे.