शहरी, ग्रामीण, दुर्गम डोंगरी भागातील आदिवासी आणि सागरी अशी संमिश्र लोकवस्ती असणाऱ्या ठाणे व पालघर या मुंबईलगतच्या दोन जिल्ह्य़ांतील जनतेच्या दैनंदिन गरजा सुलभ आणि किफायतशीर दरात भागविण्यासाठी स्थानिक उत्पादन प्रक्रियेत नावीन्य आणणे आवश्यक आहे. ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या विज्ञान केंद्रातील उपक्रम यासाठी पोषक ठरतील, असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला. 

चार वर्षांपूर्वी ‘ठाणेकर’ बनलेल्या डॉ. काकोडकर यांनी ठाणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या नियोजित विज्ञान केंद्राची ढोबळ संकल्पना ‘ठाणे लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत मांडली. डॉ. काकोडकरांच्या मार्गदर्शनाखाली हे विज्ञान केंद्र साकार होणार आहे. या विज्ञान केंद्रात शालेय वयातील मुलामुलींच्या जिज्ञासू तसेच कल्पक वृत्तीला वाव मिळेल. पाठय़पुस्तकातील वैज्ञानिक संकल्पना आणि प्रयोग पडताळून पाहण्याची त्यात सोय असेल. त्यातूनच वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित व्यावहारिक उपयोगाची साधने निर्माण होऊ शकतील, असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले.
नावीन्यपूर्ण वैज्ञानिक प्रयोगांचे केंद्र (सायन्स इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर) असे या नियोजित विज्ञानकेंद्राचे स्वरूप आहे. प्रत्येक तालुका अथवा जिल्हा पातळीवर टप्प्याटप्प्याने अशी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्याकडच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळवून द्यायला हव्यात, जेणेकरून मुलांच्या कल्पना शक्तीला वाव मिळेल. शिक्षण पद्धतीतही काळानुरूप बदल आवश्यक आहे. नियोजित विज्ञान केंद्रामार्फत ठाण्यातील नव्या पिढीला या सुविधा मिळतीलच, शिवाय फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक ज्ञानाची गंगा पोहोचवली जाईल. त्यातून सध्याच्या ‘लो कॉस्ट आणि हाय टेक’ जमान्यात गरीबांना परवडतील, अशा दरात सोयी सुविधा देण्याऱ्या संशोधनाला चालना मिळू शकेल, अशी आशाही डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केली. सध्या ‘राजीव गांधी सायन्स आणि टेक्नॉलॉजी कमिशन’च्या माध्यमातून वारणानगर आणि प्रवरानगर येथे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

अर्थव्यवस्थेत र्निबध असताना ठाणे जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांना काहीसे संरक्षण होते. मात्र सध्याच्या उदारीकरणाच्या युगात जगभरातील उत्पादकांशी स्पर्धा करायची असेल तर स्थानिक उत्पादन प्रक्रियेत नावीन्य आणणे आवश्यक आहे. त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान उपयुक्त ठरतील.
डॉ. अनिल काकोडकर

भविष्यातली मोठी बाजारपेठ
मुंबईलगत असूनही स्वतंत्र अस्तित्व राखलेल्या ठाण्याची वैशिष्टय़पूर्ण अशी सांस्कृतिक ओळख आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यातील नागरीकरणाचा मुंबईपेक्षा वेग जास्त आहे. त्यामुळे ठाणे ही भविष्यातील मोठी बाजारपेठ आहे, असे काकोडकर म्हणाले.