26 May 2020

News Flash

विज्ञान प्रदर्शनात दैनंदिन समस्यांवरील उपकरणांवर भर

गेली काही वर्षे केवळ उर्जा प्रश्नाभोवती रेंगाळणारी विद्यार्थ्यांची कल्पकता यंदा ‘पश्चिम भारत विज्ञान प्रदर्शना’च्या निमित्ताने दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या इतरही प्रश्नांकडे डोळसपणे पाहू लागल्याचे चित्र आहे.

| December 20, 2014 08:36 am

गेली काही वर्षे केवळ उर्जा प्रश्नाभोवती रेंगाळणारी विद्यार्थ्यांची कल्पकता यंदा ‘पश्चिम भारत विज्ञान प्रदर्शना’च्या निमित्ताने दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या इतरही प्रश्नांकडे डोळसपणे पाहू लागल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी या प्रदर्शनात मांडण्यात आलेले ३५ पैकी २० हून अधिक प्रकल्प हे उर्जा प्रश्नाचा विचार करणारे होते. मात्र, या वर्षी साखळीचोराचा मागोवा काढण्यास मदत करणारी केसांची क्लिप ते शेतातील औषध फवारणीसाठीचे काम सोपे करणारी दुचाकी अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर तोडगा सुचविणारी यंत्रे व साधने विद्यार्थ्यांनी विकसित केली आहेत. यवतमाळच्या अंजली गोडे हिने आपल्या शिक्षकांच्या मदतीने हे फवारणीसाठीची दुचाकी तयार केली आहे. छोटय़ा रोपांपासून फळांच्या वेलींपर्यंतच्या उंचीवरील बागांमध्ये या दुचाकीच्या मदतीने औषध फवारणी करता येते. हवेच्या दाबाच्या वैज्ञानिक तत्त्वाचा वापर करून सौरउर्जेवर चालणारी ही दुचाकी अंजलीने तयार केली आहे. त्यामुळे, औषधफवारणीचे काम सोपे होते.
महाराष्ट्रातीलच सोलापूरच्या समर्थ मोते याने साखळीचोराचा मागोवा काढण्यास मदत करणारी केसांना लावण्याची क्लिप तयार केली आहे. या क्लिपमध्ये छोटासा स्पाय कॅमेरा आहे. त्यामुळे, मागून येऊन साखळी चोरून नेणाऱ्या चोरांचे चित्रिकरण या कॅमेऱ्याच्या मदतीने करणे शक्य होते. राजस्थानच्या राघव काद्रा आणि तिलक बढाया यांनी ‘लोड डिस्ट्रब्युटर’ तयार करून बांधकाम मजुरांचे वजन हलके करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे डोक्यावरील वजनाचा भार डोक्यासह खांदे आणि पाठीवर विभागले जाते. राजस्थानमधीलच एका विद्यार्थ्यांने संगणक खेळाचे विविध प्रकार विकसित करून गेमिंगचा ‘न्यू इरा’ खुला केला आहे. यावर खेळांपासून तबल्याचे स्वरही तयार करता येतात. गोव्याच्या शिवम शर्मा या विद्यार्थ्यांने भूकंपातही तग धरून राहील असे घरबांधणीचे तंत्र विकसित करून त्याचे प्रात्यक्षिक दिले आहे. या शिवाय कचऱ्याचे व्यवस्थापन, सौर उर्जेवर वीजेची निर्मिती आदी वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केले आहेत.
महाराष्ट्रासह छत्तीसगढ, दीव दमण, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संकल्पना वापरून तयार केलेल्या ३५ प्रकल्पांची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली आहे. हा मेळावा २० डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. शाळांमधील विद्यार्थी या मेळाव्याला भेट देऊन या प्रकल्पांची माहिती घेऊ शकतात. यात ३४ विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच, गणित, विज्ञान, भूगोल या विषयांमधील किचकट संकल्पना सोप्या करून सांगणाऱ्या शिक्षकांनी तयार केलेल्या १५ प्रकारच्या अध्ययन साहित्याती माहितीही करून घेता येईल.
गुजरातची गाडी यंदाही ‘लेट’
या प्रदर्शनात गुजरातमधूनही विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर होणे अपेक्षित होते. मात्र, मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही गुजराततर्फे एकही प्रकल्प सहभागी होऊ शकला नाही. गुजरातमधील प्रकल्प निवडीची प्रक्रिया उशीरा सुरू होते. त्यामुळे गुजरातचे प्रकल्प सहभागी करून घेता आले नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2014 8:36 am

Web Title: science exhibition
Next Stories
1 मध्य रेल्वेवर नव्या बंबार्डिअर
2 वाहतूक नियम उल्लंघनाचे मुंबईत १८ लाख गुन्हे दाखल
3 राज्य नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत
Just Now!
X