सौर उर्जेवर चालणारे ‘बहुकार्यक्षम व ऊर्जा बचत कृषी’ यंत्र, आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारा स्वयंचलित ‘रोबोट’, डास विरहीत घर, माती आणि काही पूरक घटकांपासून केलेली वीज निर्मिती, औषधी वनस्पतींचा परिचय, पर्यावरणपुरक असणारी वाहतूक यंत्रणा.. असे विविध कलाविष्कार क. का. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित ४० व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनात सादर झाले. आदिवासी व बिगर आदिवासी भागातील शाळांमधील २२४ विद्यार्थ्यांनी ११२ प्रकल्प सादर केले आहेत.
येथील क. का. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आणि कर्मवीर क. का. वाघ शिक्षण संस्था यांच्यातर्फे आयोजित या विज्ञान प्रदर्शनास मंगळवारी सुरुवात झाली. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी उपस्थित होते. ग्रामीण, शहरी व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी अनोख्या संकल्पना प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रत्यक्षात आणल्याचे पहावयास मिळाले. सिन्नर येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बहुकार्यक्षम व उर्जाबचत कृषी यंत्र तयार केले. पाण्याचा दाबाचा वापर करत हे यंत्र काम करते. टाकाऊ वस्तुंचा वापर करत तयार केलेले हे यंत्र शेतीत नांगरणी, वखरणी, कोळपणी यासह फवारणीचे काम करत आहे. यासाठी हजार रुपये खर्च आला. महिलांना दैनंदिन कामात होणारा त्रास कमी करण्यासाठी कळवण येथील आर. के. एम. महाविद्यालयाने अवघ्या ४०० रुपयात लादी साफ करणारे छोटे यंत्र तयार केले आहे. बागलाण तालुक्यातील आराई येथील के.बी.एच विद्यालयाने कचरा व्यवस्थापनाचा आधार घेत बायोगॅसची निर्मिती करणारे यंत्र तयार केले आहे. अभोणा येथील जनता विद्यालयाने गंभीर व तणावग्रस्त भागाची माहिती देणारा स्वयंचलित रोबोट तयार केला आहे. संशयास्पद ठिकाणी शोध घेणे, आगीत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढणे आदी कामे तो करतो. चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन माध्यमिक विद्यालयाच्यावतीने रेल्वे शौचालयामुळे होणारी घाण टाळण्यासाठी ‘सोलेनाईड व्हॉल्व्स’चा वापर करत बायोगॅस तयार करणाऱ्या यंत्राची निर्मिती केली आहे. सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने पर्यावरण पूरक वाहनव्यवस्था कशी असेल यावर प्रकाश टाकला आहे.
दरम्यान, प्रदर्शनासाठी आदिवासी भाग असलेल्या तालुक्यातून प्राथमिकस्तर म्हणजे पहिली ते आठवीमधून चार व माध्यमिक म्हणजे नववी ते १२ वी गटातून चार अशी एकुण आठ, बिगर आदिवासी तालुक्यातून प्राथमिक व माध्यमिक स्तरातून एकुण सहा याप्रमाणे जिल्ह्यातून आदिवासी तालुक्यातून ६४ वैज्ञानिक प्रकल्पांसह १२८ विद्यार्थी तसेच बिगर आदिवासी तालुक्यातून ४८ वैज्ञानिक प्रकल्पासह ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्यासाठी प्राथमिक व माध्यमिक तसेच प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर निर्मित वैज्ञानिक साधनांसह सहभाग नोंदविला आहे. तीन दिवस सुरू राहणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप १ जानेवारी रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती किरण थोरात, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप उपस्थित राहणार आहेत. क. का. वाघ शिक्षण संस्थेच्यावतीने वैज्ञानिक विचारांचा प्रसार करणाऱ्या ‘दिशा मांगल्याच्या’ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.