केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे सहावीपासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘इनोव्हेशन इन सायन्स पस्र्युट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च’ (इन्स्पायर) या योजनेअंतर्गत मुंबईत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
१३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात होणाऱ्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले विज्ञान प्रकल्प मांडले जातील. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ांतून ७४४ प्रकल्प निवडण्यात आले असून ते सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत खुले असतील.
केंद्र सरकारच्या इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड या योजनेत देशातील खासगी, सरकारी, अनुदानित, कायम विनाअनुदानित अशी सगळी विद्यालये समाविष्ट आहेत. तसेच ज्या विद्यालयांमध्ये सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते, अशा विद्यालयांचाही यात समावेश आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील संशोधन करण्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. योजनेत केलेल्या तरतुदीनुसार दरवर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी एकदा एकरकमी पाच हजार रुपये आणि अ‍ॅवॉर्ड प्रमाणपत्र दिले जाते.
सरकारने दिलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम ही विज्ञान प्रकल्प बनवण्यासाठी किंवा विज्ञान प्रतिकृती बनवण्यासाठी वापरायची असून उरलेली रक्कम ही जिल्हास्तरीय प्रदर्शनात विद्यार्थ्यांने बनवलेले प्रकल्प मांडण्यासाठी देण्यात आली आहे. या रकमेतूनच विद्यार्थ्यांचा प्रवासखर्चही समाविष्ट आहे. हे प्रदर्शन मुंबईत १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
यासाठी मुंबईबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या निवासाची सोयही करण्यात आली आहे. या प्रदर्शनात राज्यभरातील ७४४ प्रकल्पांचा समावेश आहे.
हे प्रदर्शन दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्या संकुलात होणार असून ते सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वासाठी खुले असेल.