नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित पंचवटीतील सीडीओ मेरी शाळेत पंचायत समिती आणि नाशिक तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने आयोजित ३८वे नाशिक तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवारपासून सुरू होत आहे.
प्रदर्शनाचा विषय ‘विज्ञान आणि समाज’ असा आहे. पहिली ते आठवी, नववी ते बारावी अशा दोन गटांत विद्यार्थी व शिक्षक प्रतिकृती तसेच इतर साहित्य निर्मिती करून मांडणार आहेत. प्रयोगशाळा परिचर याचाही स्वतंत्र विभाग असून लोकसंख्या, शिक्षण व पर्यावरण या विषयावर शिक्षक साहित्य मांडणार आहेत. तालुक्यातील शहरी व ग्रामीण विभागातील प्राथमिक शाळा प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनांचे उद्घाटन गुरुवारी सकाळी ११ वाजता नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, पंचायत समिती सभापती अनिल ढिकले, आ. डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी पाटील, गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी, रमेश देशमुख, कार्यवाह शशांक मदाने आदी उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी तीन वाजता उपसभापती कैलास चव्हाण यांच्या हस्ते व मेरी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप फडके, महासंचालक प्रकाश भामरे, विजयश्री चुंबळे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
विज्ञान प्रदर्शनास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी, प्रशासनाधिकारी नितीन उपासनी, गटशिक्षणाधिकारी महेंद्र भोये, संयोजक विस्तार अधिकारी व्ही. डी. चव्हाण, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष एन. एन. खैरनार, दिलीप अहिरे व अनिल पवार यांनी केले आहे.