देशातील विविध संशोधन संस्थांमध्ये सुरू असलेल्या कामाची माहिती देणारे प्रदर्शन वरळीच्या ‘नेहरू विज्ञान केंद्रा’त भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ‘विज्ञान आणि समाज’ अशा या प्रदर्शनाचा विषय आहे.
यात सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंग, नॅशनल केमिकल लेबॉरेटरी, नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जी, हाफकीन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रेनिंग रिसर्च अॅण्ड टेस्टिंग, सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिटय़ूट, नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टाटा मेमोरिअल सेंटर, अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर आदी संस्थांचा यात समावेश आहे. बुधवारी अॅटोमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष डॉ. आर. के. सिन्हा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या संस्थांमध्ये सुरू असलेल्या विविध वैज्ञानिक संशोधन व विकासकामांची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे. सामान्य व्यक्ती आणि संशोधन संस्थांमध्ये असलेली दरी भरण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या दरम्यान नामवंत वैज्ञानिकांच्या भाषणांचे आयोजनही करण्यात आले आहे. या शिवाय विज्ञान मंजूषा, वक्तृत्व स्पर्धा, पॉवरपॉइंट सादरीकरण, सायन्स-टून स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, अवकाश निरीक्षण आदी कार्यक्रमांचाही समावेश असेल. सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान हे प्रदर्शन खुले राहील. शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजता प्रदर्शनाचा समारोप होईल. प्रदर्शनाला भेट देण्यासंदर्भात मुख्याध्यापकांच्या सहीचे पत्र असल्यास शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कातून सवलत दिली जाईल.