एका ठिकाणाहून दुसरीकडे वीज वाहून नेण्यासाठी वाहिन्या अर्थात ‘वायर’ची गरज पडणारच हे सर्वसाधारण गृहीतक. घरात एखादे उपकरण सुरू करण्याचा किरकोळ प्रश्न असो, अथवा शहरात अथवा गावोगावी वीज वितरित करावयाचा विषय असो.. वाहिन्यांचे दृष्टिपथास पडणारे जाळे त्याचे निदर्शक. तथापि, या वाहिन्या अर्थात वायरचा वापर न करतादेखील वीज वितरित करता येऊ शकते ही बाब अभिनव वैज्ञानिक प्रकल्पातून रचना विद्यालयातील श्रेयस कुलकर्णी या विद्यार्थ्यांने प्रत्यक्षात आणली आहे. चुंबकीय क्षेत्राचा वापर करून वीज वितरणाचा श्रेयसचा हा प्रकल्प नाशिकला तब्बल २५ वर्षांनंतर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पहिल्या क्रमांकाचे यश मिळवून देणारा ठरला.
बाल मनातील कुतुहल उलगडण्याचे काम पालकांनी नेटाने केले आणि त्यास शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जोड लाभली की काय घडू शकते याचे उदाहरण म्हणून श्रेयसच्या ‘वायरलेस इलेक्ट्रीसिटी ट्रान्सफर’ प्रयोगाकडे पाहाता येईल. रचना विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या श्रेयसचा हा प्रकल्प चेन्नई येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्राकडून सादर होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे रत्नागिरी येथे झालेल्या ४० व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातुन सादर झालेल्या ‘तार विरहीत वीज वितरण’ प्रकल्पाने सर्वाना आश्चर्यचकीत केले.
प्रदर्शनात भेट देणाऱ्या तज्ज्ञांनी अभिनव संकल्पनेला दाद देऊन त्याचे अभिनंदन केले होते. तारेविना विजेचे वहन करून त्याचा प्रत्यक्षात वापर कसा केला जातो ते श्रेयसने दाखविले. सौर ऊर्जेद्वारे निर्मिलेली वीज बॅटरीत साठविली जाते. बॅटरीतील वीज कोणत्याही उपकरणात वापरण्यासाठी वायरचा वापर न करता वहन करता येते. वीज वहनासाठी प्रयोगात दोन चुंबकांचा वापर करण्यात आला आहे. एका चुंबकावर दुसरे चुंबक धरल्यास चुंबकीय क्षेत्र तयार होते. या तत्त्वाचा आधार घेऊन सहजपणे वीज वितरित करून भ्रमणध्वनी ‘चार्जिग’ करणे अथवा दिवे प्रकाशमान करता येतात.
पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत या प्रकारे वीज वितरणात गळतीचे प्रमाण नगण्य असते. कमी वीज लागणाऱ्या उपकरणांमध्ये ही यंत्रणा उपयुक्त आहे. दिवसा वा रात्री कधीही या माध्यमातून वीज वहन करता येते.
अतिदुर्गम भागात ज्या ठिकाणी अद्याप वीजवाहिन्यांचे जाळे पोहोचलेले नाही, तिथे या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करता येईल, असे श्रेयसने सांगितले. सौर ऊर्जेचा वापर होत असल्याने आर्थिक भारही पडत नाही. सध्या प्रायोगिक तत्त्वावर निर्मिलेल्या या यंत्रणेमार्फत याच पद्धतीने एखाद्या गावात वीज पुरवठा करणे शक्य असल्याचा दावाही त्याने केला. श्रेयसचा हा काही पहिला प्रयोग नाही. कुटुंबीयांच्या पाठबळामुळे तो लहानपणापासून वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग प्रत्यक्षात आणण्यात मग्न असतो. याआधी त्याने ‘एफएम रेडिओ’, यंत्रमानव, प्लाझमा अशा अनेक गोष्टी घरीच निर्मिल्या आहेत. डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक, ‘ऑस्ट्रेलिया केमिस्ट्री’ या परीक्षांमध्येही त्याने सहभागी होत यश मिळविले.
इतकेच नव्हे तर, प्रेरणा वैज्ञानिक प्रदर्शन, यंत्रमानव निर्मिती कार्यशाळा आदींमध्ये पारितोषिके पटकावली. शिक्षण विभागातर्फे श्रेयसचा काही दिवसांपूर्वी सत्कार करण्यात आला. श्रेयसच्या प्रयोगाने अडीच दशकानंतर नाशिकला राज्यस्तीय प्रदर्शनास हे यश मिळवून दिल्याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. तारविरहित वीजवहनाच्या प्रयोगात कुटुंबीयांसह मुख्याध्यापिका सुचेता येवला यांचे श्रेयसला मार्गदर्शन लाभले. रचना विद्यालयातील शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी मार्गदर्शनाबरोबर प्रोत्साहन दिले.