‘‘विज्ञान काल्पनिकांचा वाचकवर्ग विस्तारायला हवा. इंग्रजीबरोबरच इतर भारतीय भाषांपर्यंत आणि शक्य झाल्यास या भाषांच्या विविध बोलींपर्यंत विज्ञान साहित्य पोहोचायला हवे,’’ असे मत ‘इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन’ च्या (इस्त्रो)
 सामरिक गटाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. वाय. एस. राजन यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ आणि यशवंतराव मोहिते महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या ‘सायन्स फिक्शन स्टडीज’ या विषयावरील जागतिक परिषदेत ते बोलत होते. हाँगकाँग पॉलिटेक्निक विद्यापीठाच्या डॉ. ख्रिस्टिना डी कर्सी, भारती विद्यापीठाचे सचिव डॉ. विश्वजीत कदम या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राजन म्हणाले, ‘‘रोजच्या जीवनातील समस्यांकडे पाहण्याच्या विविध वैज्ञानिक दृष्टिकोनांविषयी जाणून घ्यायची उत्सुकता सामान्य नागरिकांत निर्माण व्हायला हवी. या वैज्ञानिक दृष्टिकोनांविषयी त्यांना आपली माहितीपूर्ण मतेही मांडता यायला हवीत. मी माझ्या परीने यासाठी प्रयत्न केले, पण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अशा कामापासून दूर राहणेच पसंत करीत असल्याचे मला दिसले. ‘आम्ही सर्वज्ञ आहोत, त्यामुळे सामान्यांना या बाबींची फिकीर करण्याचे कारण नाही’ असा यांपैकी बऱ्याच संस्थांचा आविर्भाव असल्याचे मला जाणवले. फारच कमी तज्ज्ञ सामान्य नागरिकांपर्यंत विज्ञान-तंत्रज्ञान पोहोचावे
यासाठी धडपडतात. यामुळे विज्ञान आणि देशातील सामान्य जनता यात मोठी दरी राहून गेली आहे. विज्ञानविषयक साहित्याचा
वाचकवर्ग विस्तारायला हवा. इंग्लिशबरोबरच इतर भारतीय भाषांमध्ये आणि शक्य झाल्यास विविध बोलींमध्येही विज्ञान साहित्य निर्माण व्हावे.’’