विज्ञानाच्या पुस्तकामध्ये बल, ऊर्जा, दाब यांची सूत्रे छोटय़ा छोटय़ा गमतीदार प्रयोगांमधून उलगडली आणि रोजच्या वापरातील वस्तू आणि यंत्रांमागील कठीण वाटणारे शास्त्र विद्यार्थ्यांना सोपे वाटू लागले. ज्ञानप्रबोधिनी आणि केपीआयटी कमिन्स यांच्या ‘छोटे सायन्टिस्ट’ या उपक्रमामध्ये केपीआयटीचे कार्यकारी संचालक रवी पंडित यांनी विद्यार्थ्यांशी गुरुवारी संवाद साधला.
ज्ञानप्रबोधिनी आणि केपीआयटी कमिन्स यांच्यातर्फे दारवली येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रयोग आणि खेळांच्या माध्यमातून केपीआयटीच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शास्त्र विषयाचे शिक्षण दिले. यावेळी ज्ञानप्रबोधिनीचे विवेक पोंक्षे, शाळेचे मुख्याध्यापक डी. सी. तारू उपस्थित होते. पंडित म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या मनातील विज्ञानाचा बाऊ घालवण्यासाठी त्यांना विषय रंजक पद्धतीने शिकवणे आवश्यक आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आमचे कर्मचारी आठवडय़ातील एक दिवस निवडक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.’’ पोंक्षे म्हणाले, ‘‘शाळांमध्ये मोठी विद्यार्थी संख्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येकवेळी प्रयोग करून बघता येत नाहीत. विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळावी आणि त्यातून विषय उलगडत जावा यासाठी प्रयोगांच्या माध्यमातून त्यांना शिकवणे आवश्यक असते.
ज्ञानप्रबोधिनी आणि केपीआयटीतर्फे मुळशी खोऱ्यामधील १५ आणि मावळातील ५ शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातो. या शाळांमधील ८०० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. केपीआयटीचे ४०० कर्मचारी या उपक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत.