विज्ञान दिनानिमित्त शहरातील विविध विद्यालय तसेच महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या विज्ञान प्रकल्पासह विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवनवीन संशोधनाची माहिती मिळावी यासाठी नामवंतांची व्याख्याने झाली. काही विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान साहित्याचा पुरवठा करून एखादा प्रकल्प तयार करून आणण्याचे आवाहन करण्यात आले. या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.

डे केअर सेंटर

शहरातील डे केअर सेंटर शाळेत विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात सुजाता बाबर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वच गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे म्हणजे विज्ञान होय. तर्कावर आधारीत ज्ञान म्हणजे विज्ञान. ज्ञानाचा विवेकाने वापर करणे म्हणजे विज्ञान होय. आधुनिक विज्ञान हे अपघातातून उदयास येते असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या सहसचिव अ‍ॅड. अंजली पाटील, मुख्याध्यापक शरद गीते, सुनीता बुरकुले, अनुजा पाठक आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘विज्ञान ज्योत हाती’ हे विज्ञान गीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लुई पाश्चर, जोसेफ क्रिष्टले यांची माहिती दिली. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात आली. प्रास्ताविक कल्पना देशमुख यांनी केले. धनंजय गुंजाळ व चेतना वसावे यांनी सूत्रसंचालन केले.

सीडीओ मेरी हायस्कूल

सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये आयोजित विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात डॉ. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन अशोक कोठावदे, संस्था सहकार्यवाह दिलीप अहिरे, पर्यवेक्षिका मुग्धा काळकर, पं. न. बिरारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुंदन गवळी यांनी विज्ञान दिनाची माहिती दिली. कोठावदे व अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘जलचक्र’ चे प्रकाशन करण्यात आले. विज्ञान प्रमुख भारती भोये यांनी प्रास्ताविक केले. यशश्री दामले यांनी परिचय करून दिला. राहुल चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली चिंचोले यांनी आभार मानले

सारडा कन्या शाळा

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सारडा कन्या विद्यामंदिर शाळेत विज्ञान छंद मंडळाच्या वतीने दोन सत्रात विज्ञानदिनाचे कार्यक्रम झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ शिक्षिका कृष्णा राऊत उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनीनी सी. व्ही. रमण यांच्या जीवनावरील आणि विज्ञानातील अद्भुत घटनांविषयी माहिती दिली. राऊत यांनी डॉ. अब्दुल कलाम, थॉमस अल्वा एडिसन यांच्या कार्याविषयी सांगितले. गीता कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. ॠतुजा अहिरे हिने सूत्रसंचालन केले. रिध्दी चौधरी हिने आभार मानले.

एस. के. पांडे विद्यालय

 नाशिकरोडचे साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. पांडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान दिनाचे आयोजन प्राचार्य अलका एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. विज्ञान छंद मंडळाचे उपाध्यक्ष बी. डी. घोटेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य आर. व्ही. जोशी यांनी विज्ञान दिन आणि डॉ. रमण यांच्या संशोधनाविषयी माहिती दिली. भविष्यात विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले. ए. एस. वाकचौरे यांनी आभार मानले. ए. के. बागूल यांनी सूत्रसंचालन केले.