व्यावसायिक अभ्यासक्रमांना एकीकडे कात्री लागली असतानाच दुसरीकडे राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये पारंपरिक विद्याशाखा असलेल्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये यावर्षी भर पडलेली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या २३ महाविद्यालयांतील २४ अभ्यासक्रमांना मान्यता दिलेली आहे. मात्र बीए, बी.कॉम. आणि बी.एस्सी.  या अभ्यासक्रमांना कायम विनाअनुदान तत्त्वावर मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४मधील कलम ८२(४) नुसार राज्यातील विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांना विद्याशाखा मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करता येतो. त्यानुसार या शैक्षणिक वर्षांत प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून छाननी करून या २४ अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. शिवाय महाविद्यालयांच्या संस्था संचालकांनी १०० रुपयाच्या स्टँप पेपरवर अनुदानाची मागणी करणार नसल्याचे हमीपत्र विभागीय सहसंचालकांना सादर करून झाल्यावरच विद्यापीठाने संलग्नतेची प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचनाही शासनाने दिल्या अनेक महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नाहीत. एकही विद्यार्थी नसलेली महाविद्यालयेही अस्तित्वात असल्याची वस्तुस्थिती असली तरीही संस्थाचालकांना नवीन अभ्यासक्रमांचा आवश्यकता भासावी, यातच शहरांपेक्षा गावखेडय़ांमध्ये या अभ्यासक्रमांना मागणी असल्याचे दिसून येते. शासनाने मान्यता दिलेली हे सर्व अभ्यासक्रम ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील आहेत. यावर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित पवनी तालुक्यातील कोंढा कोसऱ्याचे डॉ. अरुण मोटघरे कला महाविद्यालयात बी.एस्सी. तर भिवापूरच्या गुरुकुल महाविद्यालयात बी.ए. या विद्याशाखांना मान्यता देण्यात आली आहे. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात चिमूर तालुक्यातील भिसीच्या महाविद्यालयात बी.कॉम. तर चंद्रपुरातील एफईएस गर्ल्स महाविद्यालयाला बी.एस्सी. देण्यात आले आहे. चंद्रपुरातील वरोऱ्याच्या लोकमान्य कला महाविद्यालयाला अकाउंटिंगचे काही विषय मिळाले आहेत. पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त सात अभ्यासक्रम देण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठाने या अभ्यासक्रमांची मागणी केली व त्यांना ती मिळाली.