टोल विरोधातील आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली असल्याचे गुरुवारी लॉरी ऑपरेटरचा महापालिकेला घातलेला घेराव, महापौरांनी उपोषणाला दिलेला पाठिंबा आणि प्रकृती खालावली असतानाही जयदीप शेळके यांनी पुन्हा उपोषणस्थळी सुरू केलेले आंदोलन या घटनांतून दिसून आले.     
टोल रद्द व्हावा या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून महापालिकेसमोर नऊ कार्यकर्त्यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला विविध स्तरांतील नागरिकांकडून पाठिंबा मिळत चालला आहे. कोल्हापूर लॉरी ऑपरेटर असोसिएशनने आंदोलनाला पाठिंबा देत आज महापालिकेला लॉरीसह घेराव घातला. सुमारे ३५ लॉरींचा वेढा महापालिकेला पडला होता. यामुळे मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या महापालिका सभोवतालची वाहतूक विस्कळीत झाली होती. लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. टोलमुळे सहन कराव्या लागत असलेल्या अडचणींची माहिती त्यांनी दिली. तसेच महापौर सुनीता राऊत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन आपला पाठिंबा जाहीर केला.    
दरम्यान, प्रकृती खालावल्यामुळे बुधवारी जयदीप शेळके या आंदोलकास रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज ते पुन्हा सलाईन लावलेल्या अवस्थेतच उपोषणस्थळी परत आले. त्यांनी उपोषणस्थळीच आंदोलन करण्याचा इरादा व्यक्त केला. अनेक प्रमुखांनी शेळके यांनी किमान पाणी पिऊन उपोषण करावे, अशी विनंती केली. पण त्यास त्यांनी सहमती दर्शविली नाही. त्यांच्या भावनिक हट्टामुळे आंदोलनस्थळी चिंतेचे वातावरण होते.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, रा. ल. जोशी, माणिक पाटील, हंबीरराव मुळीक यांची प्रकृती खालावली असल्याचे आज दिसत होते. माजी उपमहापौर रा. ल. जोशी हे ६५व्या वर्षांतही आंदोलनात सहभागी झाले आहेत. माजी नगरसेविका माणिक पाटील या एकमेव महिला पहिल्या दिवसापासून आंदोलनात उतरल्या आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक महिला दिवसभर आंदोलनस्थळी जमलेल्या असतात.