कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या आपत्ती व्यवस्थापनाला आता स्कूबा डायव्हिंगचे आधुनिक परिमाण मिळाले असून ते बुधवारी लोकार्पण करण्यात आले. यासाठी पुढाकार घेतलेल्या व्हाईट आर्मी या सेवाभावी संस्थेने बुधवारी पंचगंगा नदीमध्ये स्कूबा डायव्हिंगचे प्रात्यक्षिक घेताना ४० फूट खोल पाण्यात जाण्याचा थरारही अनुभवला.     आपत्ती व्यवस्थापनासाठी स्कूबा डायव्हिंगची यंत्रणा आत्मसात करण्याचा निर्धार व्हाईट आर्मीने केला होता. त्यासाठी या संस्थेला उद्योगपती किशोर मुसळे यांनी स्कूबा डायव्हिंगसाठी आवश्यक असणारे मास्क, टॉर्च, हँडग्लोज, ऑक्सिजन सिलेंडर, बूट, गॉगल आणि जलचर प्राण्यांनी हल्ला केल्यास संरक्षण म्हणून धारदार शस्त्रे आदी साहित्य पुरविण्यात आले आहे.    
स्कूबा डायव्हिंगव्दारे ४० फूट खोल पाण्यात जाणे, पाण्याखाली तासभर राहून शोधमोहीम राबविणे, पाण्याची खोली मोजणे, जलपर्णी निर्मूलन करणे, पाण्यात अडकलेला मृतदेह काढणे आदी कामांसाठी वापर करता येतो, असे या संस्थेचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी शहरातील सुनिल कांबळे व इचलकरंजीतील निखिलेश जावळे या तरूणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना मुंबईच्या गणेशसिंग यांनी मार्गदर्शन केले आहे. यापूर्वी महापालिकेच्या मदतीने अंबाई टँक, क्रशर चौक येथील खण,आरेगावातील विहीर, शिंगणापूर बंधारा येथे यशस्वी प्रात्यक्षिके झाली आहेत.