21 February 2019

News Flash

व्यवसायातील अनियमितता व दुष्काळामुळे ‘दर्याचा राजा’ कर्जबाजारी

गौरी-गणपती, होळी या सणांबरोबरच नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजाचा आनंदाचा व महत्त्वाचा सण मानला जातो.

| August 29, 2015 05:22 am

गौरी-गणपती, होळी या सणांबरोबरच नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजाचा आनंदाचा व महत्त्वाचा सण मानला जातो. या कोळी समाजावर मच्छीमार व्यवसायातील अनियमितता, मासळीचा दुष्काळ व दलालांकडून होणारी लूट यामुळे सध्या नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे दर्याचा राजा असलेला हा मच्छीमार  व्यावसायिककर्जबाजारी होऊ लागला आहे. आज दर्याची (समुद्राची) आनंदाने पूजा तर केली जाते, परंतु परिस्थितीनुसार काही ठिकाणी नारळाला सोनेरी कागद लावून हा सोन्याचा प्रतिकात्मक नारळ अर्पण केला जाण्याची परंपरा आजही कायम राखण्याचा प्रयत्न कोळी समाजाकडून केला जात आहे.सण आयलाय गो नारळी पुनवंचा या आपल्या बोलीभाषेतील गोडव्याने नारळी पौर्णिमेच्या सणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मच्छीमारांची व्यावसायिक स्थिती गंभीर होऊ लागली आहे. लाखो रुपये खर्च करून मच्छीमारीसाठी बोटी तयार केल्या जात आहेत. त्यासाठी शासकीय अनुदान मिळत असले तरी त्यानंतर संपूर्णपणे व्यवसायावरच हा संपूर्ण डोलारा अवलंबून असतो. सध्या मच्छीमारी करण्यासाठी लागणाऱ्या खलाशांना मालकाकडून मासेमारीचा खर्च वजा जाता मिळालेल्या मासळीचा निम्मा वाटा द्यावा लागतो. त्याचप्रमाणे पावसाचे चार महिन्यांतील दोन महिने तर मासेमारीवरच बंदी असल्याने व पावसात मासेमारी करणे धोकादायक असल्याचे पाहता वर्षांतील आठ महिनेच हा व्यवसाय करता येतो. तर दुसरीकडे शासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलतीही वेळेत मिळत नाहीत याबाबत नाराजी व्यक्त करताना इतर खर्चातही वाढ झाल्याचे करंजा कोंढरी येथील  मच्छीमार आकाश भोईर यांनी सांगितले. अनेकदा मासेमारीसाठी बोटी खोल समुद्रात गेल्यानंतर रिकामेच परतावे लागते. त्या वेळी एका फेरीसाठी लागणारा दीड ते दोन लाखांपर्यंतचा झालेला खर्च सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे मच्छी खरेदी करणाऱ्या दलालांकडूनही लूट केली जाते, याचाही परिणाम व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे व्यवसाय टिकविण्यासाठी शेकडो मच्छीमारांना आपल्या घरातील दागिने विविध बँका तसेच सोनारांची दुकाने व खाजगी व्यक्तींकडे गहाण ठेवण्याची वेळ आल्याची माहिती सीताराम नाखवा यांनी दिली. त्यामुळे सोन्याचा नारळ देण्याची प्रथा असणाऱ्या सणाला प्रतीकात्मक नारळ तयार करून त्याला सोन्याच्या रंगाचा कागद लावून तो दर्याला अर्पण करण्याची वेळ आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या व्यवसायाला शासनाने वेळीच लक्ष देऊन व्यवसायातील अडचणी दूर करून मदत केली नाही तर मच्छीमार व त्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या लाखो रोजगाराचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

First Published on August 29, 2015 5:22 am

Web Title: sea king feel business irregularities and drought in fishing
टॅग Fishing