भारतातील जलवाहतुकीला प्राधान्य देणारे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईतील संभाव्य जलवाहतूक मार्गाचा आढावा घेतला असून यात नेरुळ ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गाचा समावेश आहे. त्यासाठी बेलापूर व नेरुळ येथे जेट्टी बांधण्यात येणार असून नवी मुंबईला हॉवरक्राफ्ट जलवाहतुकीचा इतिहास आहे. मात्र कामगारांच्या प्रश्नामुळे ही वाहतूक आठ वर्षांपूर्वी कायमची बंद पडली. वाशी ते गेट वे ऑफ इंडिया यादरम्यान ही वाहतूक सुरू होती.
मुंबईला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे सागरी जलवाहतूक हा वाढत्या वाहतूक कोंडीवरील चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे मुंबईच्या पूर्व व पश्चिम मार्गावर जलवाहतूक सुरू करण्यात केंद्र सरकार इच्छुक असून नितीन गडकरी यांनी हे ध्येय बनविले आहे. त्यासाठी मुंबईच्या समुद्रात सागरी बसची चाचणीदेखील घेण्यात आली आहे. मुंबईप्रमाणेच नवी मुंबईलाही ६० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभल्याने मुंबई आणि नवी मुंबईला सागरी मार्गाने जोडण्याच्या दृष्टीने बेलापूर व नेरुळ येथून जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव सिडकोने यापूर्वी रस्ते विकास महामंडळाला दिलेला आहे. त्यासाठी अनुदान देण्याची तयारीही सिडकोने दर्शवली आहे. बेलापूर येथून सागरी वाहतूक सुरू करण्यास खडक आणि दलदल याचा अडथळा येणार असल्याने नेरुळ ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गावर ही वाहतूक करणे शक्य असून तसा अहवाल रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. शुक्रवारी गडकरी यांनी या संदर्भात महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती. माजी मंत्री गणेश नाईक यांनी या जलवाहतुकीची पहिली मागणी केली होती, पण आघाडी सरकारने ते फारसे मनावर घेतले नाही. केंद्र व राज्यात आता भाजप सरकार असल्याने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी ही मागणी आता लावून धरली असून गडकरी यांना पालिका निवडणुकीपूर्वी सदर जलवाहतूक सुरू करावी अशी गळ घातली आहे, पण या संदर्भात वाहतूक तसेच त्यावर अवलंबून असणारे पर्यटन या सर्व बाबींचा विचार करता हा मार्ग सुरू होण्यास आणखी तीन महिने लागणार असल्याचे समजते.
विकास महाडिक, नवी मुंबई