राज्यातील कारागृहातून फरार झालेल्या कैद्यांचा तीन महिन्यात शोध घेतला जाईल, असे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
येरवडा कारागृहात एका कैद्याने केलेल्या आत्महत्येबाबत आमदार गिरीश बापट यांनी प्रश्न मांडला. कारागृहांमध्ये सीसीटीव्ही लावा, कैदी किती आहेत, कर्मचारी किती आहेत, अधिकाऱ्यांना कैद्यांजवळ कोणत्या वस्तू आढळल्या? असे त्यांनी विचारले. येरवडा कारागृहात ६ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रल्हाद वीर या कैद्याने आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. कारागृहात ५५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. आणखी २३२ कॅमेरे लावले जाणार आहेत. कारागृहात ५६३ पदांना मान्यता देण्यात आली असून भरती प्रक्रिया सुरू आहे. आणखी ४९८ पदे भरण्यात येणार आहेत. या कारागृहातून रजेवर गेलेले २३ कैदी परत आले नाहीत. राज्यभरात अशा कैद्यांची संख्या ६५० आहे. याबाबत काय कारवाई झाली, अशी विचारणा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. कारागृहातून फरार झालेल्या कैद्यांचा तीन महिन्यात शोध घेतला जाईल, असे उत्तर गृह राज्यमंत्री पाटील यांनी दिले.
वाळू माफियांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. हिंगोली जिल्ह्य़ातील वाळू माफियाने तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतचा प्रश्न वैजनाथ शिंदे यांनी मांडला. पोलीस, महसूल व परिवहन विभागाच्या संगनमताने हे सुरू असल्याचा आरोप आमदार नाना पटोले यांनी केला. अशा प्रकरणात आरोपींना पाठीशी घालण्याच प्रश्नच नाही. वाळू माफियांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे गृह राज्यमंत्री पाटील म्हणाले.