उरण तालुक्यात वीजपुरवठा करण्यासाठी पन्नास ते साठ वर्षांपूर्वी उरण शहर ते ग्रामीण भाग अशा एकूण साठ किलोमीटर अंतराच्या विद्युतवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या विद्युतवाहिन्या तसेच खांब जीर्ण झाल्याने येथील वीज वारंवार खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी उरण तालुक्यातील दिघोडे व खोपटे (कोप्रोली) अशा दोन ठिकाणी सबस्टेशनची उभारणी करण्याचा महावितरणचा मानस आहे. मात्र याकरिता प्रयत्न करूनही मागील दहा ते बारा वर्षांपासून सबस्टेशनसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने सबस्टेशनच्या जागेचा शोध सुरू असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने उरण तालुक्यातील उद्योग व व्यवसायांवर संकट येऊ घातले आहे. उरण तालुक्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग असून पूर्व भागाला उरण शहरात असलेल्या सबस्टेशनमधून वीजपुरवठा केला जातो. या वीजपुरवठय़ासाठी जवळपास साठ किलोमीटर लांबीच्या विद्युतवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या विद्युतवाहिन्या नादुरुस्त झाल्यानंतर ते शोधून दुरुस्त करण्यासाठी अनेक दिवस या भागातील वीज पूर्णपणे खंडीत करावी लागते. याचा परिणाम येथील जनतेच्या रोजच्या जगण्यावर होत आहे.
या समस्या दूर करण्यासाठी महावितरणने दोन सबस्टेशनमध्ये विभागणी करून नवे सबस्टेशन उभारण्याची तयारी दाखविली आहे. मात्र महावितरणचे जागेचे भाडे कमी असल्याने महावितरणला जागा भाडय़ाने मिळणे कठीण झाले आहे, तर यासाठी उदात्त भावनेने कोणी जागा देण्यासही तयार नसल्याने ही समस्या कायम राहिलेली असून त्याचा सर्वात अधिक त्रास हा पावसाळ्यातच होतो.