News Flash

एकांताची किंमत..

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका जोडप्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रसाद लाड या पोलीस हवालदाराला नुकतीच अटक करण्यात आली. एकांतवास मिळावा यासाठी उद्यानात गेलेल्या

| July 30, 2015 12:36 pm

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका जोडप्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रसाद लाड या पोलीस हवालदाराला नुकतीच अटक करण्यात आली. एकांतवास मिळावा यासाठी उद्यानात गेलेल्या जोडप्यांना धमकावून तो पैसे उकळत होता. अशा निर्जन ठिकाणी जाणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण तोतया पोलीस बनून जोडप्यांना लुटणे किंवा गुंडाकडून तरुणीचा विनयभंग आणि बलात्कार होण्याचे प्रकार तसे नवे नाहीत. त्यासाठी पोलिसांनी जोडप्यांना सुरक्षेच्या काही टिप्स दिल्या आहेत. तसेच अशा वेळी काय करावे तसेच कायद्याचे प्राथमिक ज्ञान जोडप्यांना असणे गरजेचे आहे.
प्यार करेंगे खुल्लम खुल्ला.. असे म्हणणे चित्रपटातील गाण्यापुरतेच मर्यादित आहे. प्रत्यक्षात प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमीयुगलांना एकांतच हवा असतो. मुंबईसारख्या शहरात तसा एकांत मिळणे कठीणच. यातूनही प्रेमीयुगुल एखादा आडोसा किंवा निर्जन जागा शोधून काढतात आणि तेथे बसून आपल्या आयुष्यातील सुख-दु:खाच्या गोष्टी करतात, पण या जागांमध्येही अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष धोके या युगुलांच्या भोवती असतातच.
काय धोके आहेत निर्जनस्थळावर..?
निर्जनस्थळाची सुरक्षितता हा प्रश्न शक्ती मिलच्या घटनेनंतर तेव्हा ऐरणीवर आला होता. शक्ती मिल हे काही एकमेव असे निर्जनस्थळ नाही किंवा अशा निर्जनस्थळावर घडलेला हा पहिला प्रकार नाही. काही वर्षांपूर्वी मुलुंड येथे एका प्रेमीयुगुलाला अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले. पीडित महाविद्यालयीन तरुणी एका उच्चभ्रू कुटुंबातली होती. मुलुंडला असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात ती आपल्या प्रियकरासोबत गेली. त्या वेळी संध्याकाळचे सात वाजून गेले होते. जंगल, निर्जन जागा आणि अंधार होता. त्या वेळी एका टोळक्याने ही संधी साधली. तिच्या प्रियकराला बांधून ठेवले आणि त्याच्यासमोरच पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलगी प्रतिष्ठित घरातली होती. त्यांनी पोलिसांना हा प्रकार सांगितला, पण बलात्काराची तक्रार दिली नाही. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडले. खूप विनंती करूनही मुलीच्या कुटुंबीयांनी बलात्काराची तक्रार दिली नाही. त्यामुळे त्या गुंडावर चोरी, मारामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले. आम्ही त्या गुंडांना जन्माची अद्दल घडवली पण तक्रार नसल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकलो नाही, असे त्या वेळी तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) प्रेमीयुगुलांसाठी नंदनवन. पण काही जोडपी अंधारात अतिएकांत शोधण्यासाठी जातात. काही वर्षांपूर्वी पोलिसांनी एका स्थानिक गुंडाच्या टोळीला अटक केली. तपासात धक्कादायक माहिती समोर आली. जोडप्यांना ते लुटत असत. शिवाय अनेक तरुणींवर त्यांनी बलात्कारही केले होते. पण भीती आणि बदनामीपोटी या मुलींनी तक्रार दिली नव्हती. गेली अनेक वर्षे या टोळक्याचा हा हैदोस सुरू होता आणि अनेक मुली त्यांना बळी पडल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या घटना उजेडात आल्या पण निर्जनस्थळावर असे किती तरी प्रकार होत असतात.
सध्या निर्जनस्थळावरचा आणखी एक धोका म्हणजे नकळत केल्या जाणाऱ्या चित्रीकरणाचा. प्रत्येकाच्या हातात असलेल्या स्मार्ट फोनमधील कॅमेऱ्यातून चित्रीकरण करणे सोपे झाले आहे. प्रेमीयुगुल एकांतात त्या अवस्थेत असताना काही जण लांबून त्यांचे चित्रण करतात, फोटो काढतात. नंतर हेच फोटो आणि व्हिडओ इंटरनेटवर अपलोड केले जातात. काही प्रसंगांत तर याच फोटोच्या आधारे ब्लॅकमेल केले गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
काळजी घेणे गरजेचे
मुंबई पोलिसांनी या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले तर त्यांच्यावर मॉरल पोलिसिंग (नैतिक पोलीसगिरी) चे आरोप केले जातात. प्रेमाला विरोध कुणाचाच असू शकत नाही, पण जोडप्यांनी एकांतात जाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मुंबईचाच विचार केला तर पोलिसांनी शहरात २५१ धोकादायक निर्जनस्थळांची यादीच जाहीर केली आहे. त्यात काही चौपटय़ा, किल्ले, पडक्या इमारती आदींचा समावेश आहे. याबाबत बोलताना मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, सुरक्षेबाबत तडजोड असू शकत नाही. प्रेमीयुगुले ही मुळात कुटुंबीयांना न सांगता आलेली असतात, पण त्यांनी निर्जनस्थळावर दिवसाच जावे. संधिप्रकाशही टाळावा. भुरटे चोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक प्रेमीयुगुलांना सावज बनवत असतात. चोरीच्या उद्देशाने ते त्यांना लुटतात. प्रसंगी हत्या झाल्याची उदाहरणेही आहेत. नशापाणी करणाऱ्या गर्दुल्यांचा हा अड्डा असतो. त्यांच्याकडून शारीरिक दुखापती होण्याचीही शक्यता असते. एकांतात ही जोडपी असल्याने त्यांना मदतीसाठीही कुणाला बोलावता येत नाही, त्यामुळे आपली खबरदारी आपणच घ्यायला हवी असे ते म्हणतात. प्रेमीयुगुले अल्पवयीन असतात. अनेकदा नकली पोलीस बनून त्यांना घरी सांगू, अशी धमकी देऊन घाबरवले जाते आणि मग त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, पैसे उकळले जातात. असा प्रकार सर्रास होत असतो. कुणी पोलीस असल्याचा दावा केला तर अजिबात न घाबरता पोलीस ठाण्यात घेऊन जावे.
सार्वजनिक ठिकाणी प्रेमीयुगुलांना पोलिसांची भीती असते, पण सार्वजनिक ठिकाणी प्रेमीयुगुलांना मज्जाव करणारा कायदा नाही. फक्त सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्यास मुबंई पोलीस अ‍ॅॅक्ट ११० प्रमाणे दंडात्मक कारवाई होते. अर्थात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करू नये पण कुणी तोतया पोलीस खाक्या दाखवून ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करीत असेल तर घाबरून जाता कामा नये. मुंबई पोलिसांनी निर्जनस्थळांवर गस्ती वाढवल्या आहेत, त्या प्रेमीयुगुलांच्या सुरक्षेसाठीच. पण पोलिसांना चुकविण्यासाठी जोडपी अधिक निर्जनस्थळी जातात आणि नको त्या प्रकारांना बळी पडतात. आपली सुरक्षा ही आपल्याच हाती असते. योग्य ती खबरदारी घेतली तर भविष्यातले जीवघेणे व अनिष्ट प्रसंग आपण निश्तिच टाळू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:36 pm

Web Title: secluded
Next Stories
1 मौलवींच्या ‘तक्रीज’द्वारे मुस्लीमबहुल वस्त्या स्वच्छतेच्या दिशेने
2 मालक-भाडेकरूंमधील संघर्षांची किनार जीवघेणी!
3 मोहंमद रफी यांच्या गाण्यांचे स्मरणरंजन ‘फिर रफी’
Just Now!
X