तालुक्यातील बलायदुरी गावात विषारी ताडी सेवनाने एकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेस आठवडाही होत नाही तोच काळुस्ते येथील  युवकाचा अशाचे प्रकारे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तक्रारी करून देखील इगतपुरी पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने विषारी ताडी सेवनातून मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. बलायदुरी येथील संतोष पांडुरंग भगत (३०) या युवकाचा मागील आठवडय़ात विषारी ताडी सेवनााने मृत्यू झाला. या घटनेनंतर तरी पोलिसांना जाग येईल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. परंतु अद्यापही ताडी विक्रीचे धंदे राजरोसपणे सुरू आहेत.
काळुस्ते येथील दऱ्याची वाडी येथील लक्ष्मण पांडू सावंत (२५) या युवकाचा बुधवारी रात्री विषारी ताडी सेवनाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भागातील ताडी विक्रीचे धंदे तातडीने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.