समाज प्रबोधनासाठी आणि लोकशिक्षणासाठी संतांनी मोठय़ा प्रमाणावर भारूडे रचली. रंजन आणि प्रबोधन यांचा सुरेख संगम असलेल्या भारूड या लोककला प्रकाराचे पुनरुज्जीवन व्हावे, तरुण कलावंतांनी या लोककलेकडे आकर्षित व्हावे, यासाठी राष्ट्रीय भारूड महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय भारूड महोत्सव बीड जिल्हाच्या केज तालुक्यातील दरडवाडी येथे रंगपीठ थिएटर, मुंबई या संस्थेतर्फे ८ ते १० डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाला शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचेही सहकार्य मिळणार आहे. यंदाच्या महोत्सवात ७०० हून अधिक भारूड कलावंत सहभागी होणार आहेत.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. वामन केंद्रे यांचे वडील आणि सुप्रसिद्ध भारूडकार माधवराव केंद्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दुसरा राष्ट्रीय भारूड महोत्सव दरडवाडी या त्यांच्या जन्मगावी आयोजित करण्यात येणार आहे. माधवराव केंद्रे यांना जवळपास १२०० भारूडे मुखोद्गत होती. भारूड सादर करण्याबरोबरच त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथील विद्यार्थ्यांनाही भारूडाचे प्रशिक्षण देण्याचे कामही केले होते. संतांची भूमी असलेला मराठवाडा म्हणजे भारूड या लोककलेचे आगर आहे. समाज प्रबोधनासाठी संतांनी मोठय़ा प्रमाणावर भारूडे रचली. लवचिक आणि नाटय़मय असलेला हा लोककला प्रकार प्रबोधनाबरोबरच रंजनही करतो. म्हणून हा वारसा नव्या पिढीतील कलावंतांपर्यंत पोहोचावा तसेच डोळसपणे या लोककलेचे जतन-संवर्धन करावे हा भारूड महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू आहे.  यंदाच्या दुसऱ्या राष्ट्रीय भारूड महोत्सवात संपूर्ण राज्यभरातून येणाऱ्या भारूड संचांमध्ये स्पर्धा रंगणार असून पहिले, दुसरे व तिसरे अशी तीन पारितोषिके अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ७ हजार रुपये देण्यात येणार आहेत. व्यावसायिक भारूड कलावंत आणि ग्रामीण भागांतील पारंपरिक कलावंत या दोन्ही घटकांमध्ये देवाणघेवाण व्हावी हाही उद्देश असून त्यासाठी ‘भारूड व एकूण संतसाहित्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश अर्जाची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून प्रवेश अर्जामध्ये मंडळाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि सादर करण्यात येणाऱ्या भारूडांचा तपशील पाठविणे आवश्य आहे. महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी गौरी केंद्रे (९८२०८६८६२८), अथवा अशोक केंद्रे (९९२०१२२१९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रंगपीठ थिएटर, मुंबईचे अध्यक्ष प्रा. वामन केंद्रे यांनी केले आहे.