यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत केंद्र शासनातर्फे पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व योजनेंतर्गत कराड पंचायत समितीने प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात १०० गुणंपैकी ८९ गुण मिळवून पुणे विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व ७ लाख रूपयांचा पुरस्कार पटकावला.
पंचायत राज व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या राज्यांना तसेच राज्यातील पंचायतराज संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सन २०११-१२ या वर्षांपासून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कामामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या पंचायत समितीला हा पुरस्कार दिला जातो. कराड पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यशवंत पंचायतराज अभियानात पुणे विभागात सवरेत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे विभागात द्वितीय क्रमांक मिळाला. याबाबत राज्य शासनाच्या  ग्रामविकास विभागाकडून रवींद्र नाटय़मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते कराड पंचायत समितीला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, उपसभापती विठ्ठलराव पाटील, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी पंचायत समिती सदस्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.