छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या निवडणुकीत भुजबळ यांच्यावर मात करून कधीकाळी अफाट प्रसिध्दीत आलेले बाळा नांदगावकर यांनी आता मनसेचे नेते म्हणून थेट भुजबळांच्या येवला मतदारसंघात येत येवलेकर आणि भुजबळांना शुभेच्छा दिल्याने या शुभेच्छांचे रहस्य आहे तरी काय, असा प्रश्न सर्वाना पडला आहे.
आ. नांदगावकर हे सहकुटुंब सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गेले होते. मंगळवारी सप्तशृंगीच्या दर्शनानंतर शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जाताना निफाड, विंचूरमार्गे रस्त्याची निवड करण्याऐवजी त्यांनी येवला मार्ग निवडला. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास विंचूर चौफुलीवर मनसेचे शहराध्यक्ष गौरव कांबळे, गुड्डू जावळे, निवृत्ती महाले, चैतन फुलारी, सागर बाबर, संतोष गोसावी आदी कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार स्वागत केले.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी नांदगावकरांना काही प्रश्न विचारले. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून भुजबळांवर सातत्याने होणाऱ्या आरोपांविषयी विचारले असता यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे भुजबळांनीच द्यावयास हवी, असे ते म्हणाले.   
राजकारण्यांची काही जबाबदारी असते. आरोप करणारे वेडे असतात काय, असा प्रतिप्रश्नही नांदगावकरांनी केला. येवलेकरांना आपल्या खूप खूप शुभेच्छा आहेत, असे त्यांनी नमूद करताच फक्त येवलेकरांनाच का, असा सवाल पत्रकारांनी केला.
त्यावर ‘भुजबळांनाही’ असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले. भुजबळांना लोकसभेसाठी शुभेच्छा का, असे छेडले असता, ‘मी त्यांना का शुभेच्छा दिल्या हे त्यांना माहिती आहे’ असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या शुभेच्छांचे रहस्य नेमके आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना पडला असतानाच नांदगावकर शिर्डी आणि शनिशिंगणापूरकडे रवाना झाले.