मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसारख्या शहरांमधील मुख्य रस्त्यावर अधूनमधून एका रांगेत, शिस्तीने चालणाऱ्या सरंक्षण दलाच्या हिरव्या रंगाच्या वाहनांचा ताफा अनेकांनी पाहिला असेल, पण या ताफ्याला रस्ता दाखविणाऱ्या वाहतूक पोलिसांची उडणारी तारांबळ मात्र अनेकांना माहीत नसेल. शुक्रवारी पहाटे पाच वाजता ठाण्याहून न्हावा-शेवा येथे मिसाईल घेऊन निघालेल्या संरक्षण दलाच्या बारा वाहनांना रस्ता दाखविताना वाहतूक पोलिसांची अशीच तारांबळ उडाली. नेहमी अचानक सुरू होणाऱ्या या मॉक ड्रिलचा वाटाडय़ा बनण्यासाठी रात्रपाळी आटपून अंथरूणावर अंग टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पोलिसांना या ताफ्याच्या मार्गस्थाची भूमिका निभावताना झोपेला अलविदा करण्यावाचून दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येते.
देशातील मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता यासारख्या मोठय़ा शहरांना संरक्षण दलाचे २४ तास संरक्षण आहे. त्यात मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असल्याने दहशतवादी आणि शत्रू राष्ट्राच्या रडारवर ती नेहमीच राहिलेली आहे. या मुंबईच्या संरक्षणासाठी मुंबईत मढ आयलण्ड, ठाण्यातील कामशेत, नवी मुंबईत न्हावा-शेवा आणि भर समुद्रात ओएनजीसीजवळ संरक्षण दलाचे काही बेस कॅम्प आहेत. मुंबईवर एखाद्या शत्रू राष्ट्राने हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याची तयारी कशी असावी याची संरक्षण दलाकडून अधूनमधून चाचणी आणि कवायत केली जाते. त्यासाठी अचानक स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षाला संरक्षण दलाचा ताफा निघत असल्याचे शेवटच्या क्षणाला कळविले जाते. त्यानंतर काही मिनिटांत पोलिसांना  संरक्षण दलाच्या या ताफ्याला मार्ग दाखविण्यासाठी सज्ज रहावे लागते. असाच एक दूरध्वनी शुक्रवारी पहाटे नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आल्यानंतर सर्वाची झोप उडाली. रात्रपाळी आटपून घरी जाण्याच्या बेतात किंवा घरी गेलेले अंथरूणावर अंग टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या वाहतूक पोलिसांना ठाणे-बेलापूर मार्गावर हजर राहण्याचे आदेश बिनतारी संदेशाद्वारे दिले गेले. त्यामुळे सर्व पोलिसांना काही मिनिटांत वाहतूक सुरळीत करण्यासाठी या मार्गावर यावे लागले. ठाणे येथील कामशेत येथून निघालेला हा बारा वाहनांचा ताफा सर्वप्रथम ठाणे पोलिसांनी नवी मुंबईच्या प्रवेशद्वारापर्यंत आणून सोडला. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी या ताफ्याला न्हावा-शेवापर्यंत मार्ग दाखविला. वर्षांतून चार-पाच वेळा ही मॉक ड्रिल होत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यावेळी हातातील सर्व कामे सोडून या ताफ्याचा वाटाडय़ा म्हणून हजर रहावे लागत असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.