सुरक्षतेच्या दृष्टीने पोलिसांकडून खासगी सुरक्षा एजन्सींकरिता लागू करण्यात आलेल्या नियमांना मोठय़ा कावेबाजीने बगल देण्यात येत आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव पोलीस यंत्रणेला अनुभवयाला मिळाला आहे. नेरुळ येथील एका खासगी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये रोकड भरण्यासाठी येणाऱ्या वाहनासोबतच्या सुरक्षारक्षकाकडे बंदूक नसून ग्रामीण भागात पक्ष्यांची शिकार किंवा जत्रेत फुगे फोडण्यासाठी वापरण्यात येणारी एअर गन असल्याचे समोर आले आहे. सुरक्षा एजन्सींकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणानंतर पोलिसांकडून एजन्सींना नोटिसा पाठवून सुरक्षा नियमांचे पालन करण्याची कडक शब्दात समज देण्यात आली आहे.
बँकांवरील वाढते दरोडे, एटीएम फोडण्याच्या घटना आणि बँकांच्या एटीएममध्ये रोकड भरणाऱ्या वाहनांना लुटण्याच्या वाढत्या घटनांनंतर या ठिकाणी सशस्त्र सुरक्षारक्षकांची सक्ती करण्यात आली. त्याच्याप्रमाणे सुरक्षतेच्या दृष्टीने काय काय उपाययोजना असाव्यात याच्या लेखी सूचनादेखील बँका आणि खासगी सुरक्षा एजन्सींना देण्यात आल्या आहेत. मात्र यातील अनेक सूचना खर्चीक असल्याने त्या संबंधितांकडून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत नाही. शहरातील अनेक एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत, त्यातील अनेकांनी साठी पार केलेली आहे. काही ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे हे फक्त शोभेपुरते मर्यादित आहेत. बँकांत घेऊन जाण्यात येणाऱ्या वाहनासोबत असलेला सुरक्षारक्षक हा बंदूकधारी असणे आवश्यक असते, मात्र त्याऐवजी एअर गन वापरण्यात येत आहे. ही गन वापरण्यासाठी बंदूक परवान्याची गरज नसते. तसेच ती बंदुकीच्या तुलनेने स्वस्त आणि हुबेहूब बंदुकीसारखी असल्याने सर्रास वापर करण्यात येत आहे.
ज्या बंदुकीने साधा कावळादेखील मरणार नाही अशी बंदूक या सुरक्षारक्षकांच्या हातात दिली आहे. चोरटय़ांनी रोकड लुटल्यानंतर हेच एजन्सीवाले पोलिसांच्या नावे ओरडतात, ही या प्रकरणानंतर एका अधिकाऱ्याने दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. एका एटीएमबाहेर सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सुरक्षतेबाबात प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, एखादा लुटण्यासाठी आला तर जिवावर उदार होऊ नका, ही बंदूक फक्त दाखविण्यासाठी आहे. यातूनच ग्राहकांमध्ये आपण आणि आपला पैसा सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते, असे त्याने दिलेले उत्तर सुरक्षतेच्या नावाखाली कावेबाजी करणाऱ्या सुरक्षा एजन्सींचे सत्य उघड करणारे आहे.
नेरुळ सेक्टर ४२ येथील एका खासगी बँकेच्या सुरक्षारक्षकाने शनिवारी एटीएम सेंटरमध्ये रोकड भरण्यासाठी आलेल्या वाहनासोबतच्या सुरक्षारक्षकाची बंदूक पाहण्यासाठी घेतली होती. या वेळी त्याच्याकडून चुकून स्ट्रिगर दाबला गेल्याने यातून निघालेल्या छर्राने एक तरुण जखमी झाला. ती एअर गन असल्यामुळे सुदैवाने त्या तरुणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र घटनेने त्या सुरक्षा एजन्सीचे भिंग फुटले. सुरक्षारक्षकाकडे गनऐवजी एअर गन असल्याचे समोर आल्याने पोलीस यंत्रणा चक्रावली आहे. यामुळे पोलिसांनी शहरातील एजन्सींची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे.
एअर गन हे सुरक्षतेचे साधन होऊ शकत नाही. सुरक्षतेच्या दृष्टीने बँकांच्या पैशांची वाहतूक करणाऱ्या वाहनाबरोबर सशस्त्रधारी सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. सर्व बँक व एजन्सींनी सुरक्षतेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे या संदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे.
शहाजी उमप, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १