नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे वारंवार मागण्या मांडूनही न्याय मिळत नसल्याची भावना सिटू संलग्न सुरक्षा रक्षक संघटनेचे सचिव संतोष काकडे यांनी व्यक्त केली आहे. सुरक्षा रक्षकांना सुविधा पुरविण्यास मंडळ असमर्थ ठरल्याचेही संघटनेने म्हटले आहे. या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी दोन जुलै रोजी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर दुपारी १२ ते चार या वेळेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे.
अनेक कंपन्या, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशण व वितरण, जिल्हा रूग्णालय येथे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. मंडळ स्थापन होऊन सुमारे नऊ वर्ष होत आली असली तरी सुरूवातीपासूनच मंडळाचे वतीने काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना मंडळाचे वतीने योग्य सुविधा मिळत नाहीत. गणवेश न मिळणे यांसह इतर सुविधांसाठी अनेकवेळा मंडळाकडे गाऱ्हाणे मांडूनही उपयोग झाला नसल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. मंडळाने सुरक्षा रक्षकांना देण्यात येणारे गणवेश, शिटी, बूट दिलेले नाहीत.
मंडळाच्या वतीने काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे वेतन वेळेवर होत नसल्याच्या अनेक तक्रारी मंडळाकडे केल्या आहेत. त्यावर देखील कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सुरक्षा रक्षकांना सहा-सहा महिने वेतन मिळत नसल्याचा मुद्दाही काकडे यांनी मांडला आहे.
नाशिक जिल्ह्य़ात एकूण १२५ ते १४० एजन्सी असून कंपन्या, इमारत, सोसायटी व व्यक्तीगत सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. या एजन्सीजकडून सुरक्षा रक्षकांना कशी वागणूक मिळते हे पाहण्याचे काम मंडळाचे
असताना मंडळातील अधिकारीही उडवाउडवीची उत्तरे देतात. २००४ मध्ये मंडळ अस्तित्वात आले. परंतु आठ-नऊ वर्षांच्या कालावधीत सुरक्षा रक्षकांबाबतचे कोणतेही काम मंडळाकडून झालेले नाही. मंडळाकडून सुरक्षा रक्षकांना वाऱ्यावर सोडत एजन्सीला पाठिंबा दिला
जात आहे.  संघटनेने १० हजार रूपये किमान वेतनाची मागणी केल्यावर अलीकडेच वेतनात १५०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याची देखील अमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही.
२००४ पासून सुरक्षा रक्षकांची गणवेश शिलाई १४० रूपये करण्यात आली आहे. एवढय़ा कमी दराने गणवेश शिऊन देण्यास कोणीही तयार नाही. अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षकांना विना गणवेश काम करण्याची वेळ आलेली आहे.