खते व बी-बियाण्यांनी दुकाने सज्ज असली तरी बियाणे बाजारात शुकशुकाट आहे. शेतकरी आर्थिक संकटात असल्याने त्याची पावले अद्यापही खरेदीसाठी वळलेली नाहीत. शेतकरी आणि विक्रेतेही चिंतित अशी स्थिती सध्या नागपुरातील कृषी बाजारपेठेत आहे. त्याला विदर्भही अपवाद नाही.  
मृग नक्षत्रापासून साधारणत: पेरणी सुरू होते. केवळ सात दिवसांवर मृग नक्षत्र आहे. नागपूर जिल्ह्य़ात १ हजार २०० विक्रेते असून मुख्यत्वे सुभाष मार्गावर बी-बियाणे व इतर वस्तूंची दुकाने आहेत. या ठिकाणी फेरफटका मारला असता विक्रेते व कर्मचारी ग्राहकांची पर्यायाने शेतकऱ्यांची वाट पहात बसलेले दिसले. एखाद-दुसरा अपवाद वगळता कुठेही ग्राहकी दिसली नाही. अद्यापही बी-बियाणे वा खते खरेदीसाठी शेतकरी दुकानात वळलेला नाही. बाजारपेठ मात्र सज्ज आहे. काही वर्षांपूर्वी बियाणे तसेच खतांची कमतरता भासल्याने गोंधळाची स्थिती उद््भवली होती. या पाश्र्वभूमीवर विक्रेत्यांनी यंदा मुबलक साठा करून ठेवला आहे. सोयाबीनचा अपवाद वगळता बी-बियाणे व इतर कृषिपूरक वस्तूंची यंदा विशेष भाववाढ नाही. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असली तरी कृषी बाजारपेठेत अद्यापही शुकशुकाट आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे.
विविध प्रकारची बी-बियाणे, संकरित वाण, कीटकनाशके, खते तसेच इतर कृषिपूरक वस्तूंचा भरपूर साठा विक्रेत्यांनी करून ठेवला आहे. बाजारात कापसाचे (बीजी टू) वाण ९३० रुपयात उपलब्ध आहे. गेल्यावर्षीसुद्धा हाच भाव होता. यंदा सोयाबीनचा भाव वाढला आहे. मुळात सोयाबीनची कमतरता आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी व यावर्षी गारपीट झाल्याने सोयाबीनचे पीक नष्ट झाले. सर्वाधिक फटका सोयाबीनला बसल्याने बियाणे उपलब्ध नाही. पश्चिम विदर्भातील काही भागात सोयाबीनचे पीक झाले. मात्र, सोयाबीनचे एकंदरित उत्पादनच अत्यल्प झाले. त्यामुळे सोयाबीनचा प्रचंड तुटवडा आहे. म्हणूनच त्याचा भावही अधिक आहे. सोयाबीनचे चांगल्या प्रकारचे बियाणे साधारणत: २ हजार २०० ते २ हजार ६०० रुपयांत उपलब्ध आहे.
नागपुरात सर्वाधिक कापूस व त्याखालोखाल सोयाबीनला मागणी असते. त्यानंतर भाजीपाला व इतर बियाणे विकली जातात. यंदा खते तसेच बी-बियाणांची विशेष भाववाढ नाही. कृषी वस्तूंच्या विशेषत: बी-बियाणे व खतांच्या किमतीवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. कमाल किरकोळ भावापेक्षा अधिक भावात या वस्तू विकता येत नाहीत. स्पर्धेत त्या पेक्षा कमी भाव काही कंपन्या देत असल्या तरी नफ्याचे प्रमाण त्यामानाने कमीच असल्याची माहिती विदर्भातील कृषी बाजारपेठेतील नामांकित विक्रेते आशिष सावजी यांनी दिली. इतरांच्या तुलनेत सोयाबीन व कापसाला सर्वाधिक भाव मिळत असल्याने व रोख विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे जास्त कल असतो. यंदा मात्र सोयाबीनचे बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची कापसावरच सर्वाधिक भिस्त असल्याचे विक्रेत्यांनीसांगितले.
यंदा लग्नाचे मुहूर्त आहेत. शेतकरी लगीनसराईत गुंतला आहे. उन्हं तापतच आहे. गेल्यावर्षीच्या कर्जाची परतफेड करून टाकली. त्यातच यंदा बँकांनीही असहकार पुकारला आहे. नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती बँकांचे परवाने रिझव्‍‌र्ह बँकेने रद्द केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. नवे कर्ज मिळत नाही. हातात पैसा नाही. त्यामुळे बळीराजा चिंतित आहे. हाताता पैसा नसल्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडू शकत नाही, ही वास्तविकता आहे. दोन वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. अर्धा सिझन संपला होता, असे बियाणे दुकानदारांनी सांगितले. मृग नक्षत्र तोंडावर आले असतानाच पेरणीसाठी शेतकरी शेतात मशागतीसाठी राबत आहे. नांगरणी, वखरणी तसेच शेतातील कचरा वेचण्याची कामे सुरू आहेत. नांगरणी, वखरणीसाठी बैलजोडीचा वापर कमीच होत असून  ट्रॅक्टरचा वापर केला जातो आहे. ग्रामीण भागात सर्वत्र सध्या हेच चित्र आहे.