मृग नक्षत्र सुरू होऊन तीन दिवस झाले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पऱ्हे टाकणीच्या कामांना सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आली होती, मात्र अद्याप ३९ हजार ९३७ क्विंटलपकी फक्त १९ हजार २७९ क्विंटलचा पुरवठा करण्यात आला आहे. बियाण्यांचा पुरवठा अध्र्यावरच थांबल्यामुळे शेतकरी खासगी कृषी केंद्रांमध्ये धाव घेत आहेत. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा घेत कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.
जिल्हा कृषी विभागाच्या वतीने २०१३-१४ या खरीप हंगामात पेरणीक्षेत्र आणि येणाऱ्या उत्पादकतेचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मृग नक्षत्रात पहिल्याच दिवशी पावसाने  हजेरी लावल्याने यावर्षी पावसाची स्थिती योग्य राहील, असा अंदाज शेतकरी बांधवांनी बांधला, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली आहे. यावर्षी कृषी विभागाने १ लाख ९९ हजार ७० हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरणीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यापकी १ लाख ८८ हजार हेक्टरवर भात, ३०० हेक्टरवर मका, सात हजार हेक्टरवर तूर, एक हजार हेक्टर क्षेत्रात मूग आणि शंभर हेक्टर क्षेत्रात उडीद पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यासह हळद आणि इतर कडधान्यांची लागवडदेखील करण्यात येणार आहे. मृग नक्षत्रानंतर शेतकरी भातपिकाची पेरणी सुरू करतात. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने बियाण्यांची मागणी करण्यात येते. त्यानुसार कृषी विभागाने २५ हजार ६४३ क्विंटल महाबीज बियाणे, २ हजार क्विंटल रागिणी आणि १२ हजार २५७ क्विंटल भाताच्या खासगी बियाण्यांची अशी एकूण ३९ हजार ९३७ क्विंटलची मागणी केली. त्यापकी महाबीजचे १ हजार ४३६.३७ क्विंटल आणि खासगी भात बियाण्यांच्या ५ हजार २४० असा एकूण १९ हजार २७६.३७ क्विंटल भात बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर महाबीजकडून १०० आणि खासगी कंपन्यांकडून ३५ क्विंटल तुरीच्या बियाण्यांची मागणी करण्यात आली. यापकी महाबीजने  २.७०  क्विंटल तुरीच्या बियाण्यांचा पुरवठा केला. सोयाबीनचा महाबीजने २७ आणि ढेंचाच्या १३५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला. ४० हजार क्विंटलची मागणी असताना अध्र्यापेक्षा कमी बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकणीस सुरुवात केली आहे. मात्र पंचायत समित्यांमध्ये अद्याप बियाणे उपलब्ध झाले नसल्यामुळे शेतकरी खासगी कृषी केंद्रांवर धाव घेत आहेत. याच संधीचा फायदा घेत कृषी केंद्र संचालकांनी बियाण्यांची जास्त भावाने विक्री   सुरू   केली आहे. यात शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक होत आहे.