खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे सहज उपलब्ध होतील, असा प्रयत्न कृषी विभागाने करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी कृषी विभागाला दिले. प्रादेशिक लाभक्षेत्र समन्वय समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आर.एम. चौहान, लाभ क्षेत्र प्राधिकरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक आर.के. ढवळे, सिंचनाशी संबंधित विभागाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. खरीप हंगामातील सिंचनाच्या नियोजनाकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत नागपूर विभागातील प्रकल्पांचा उपलब्ध जलसाठय़ाचा आढावाही विभागीय आयुक्तांनी घेतला. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ात पारंपरिक धान शेती करण्यात येते. येथील लाभधारकांनाही दुबार पीक घेण्यासाठी कृषी खात्याने प्रयत्न करावा, खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतिरिक्त नुकसान होऊ नये, यासाठी सर्व खात्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने पाणी आरक्षित करावे, उर्वरित जलसाठय़ाच्या उपलब्धतेनुसार पाणी जलसिंचनासाठी सोडण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना अनुप कुमार यांनी दिले. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आर.एम. चौहान यांनी या बैठकीत पेंच प्रकल्प, गोंदिया जिल्ह्य़ातील बाघ व इटियाडोह, भंडारा जिल्ह्य़ातील चांदपूर प्रकल्पात पुरेसा साठा असल्याची माहिती दिली.