पावसाने सरासरी ओलांडली
पश्चिम विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला, तरी गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे सरासरी ओलांडली गेली आहे. अमरावती विभागात सरासरीच्या १६३ टक्के पावसाची नोंद झाली असून १५ तालुक्यांमध्ये तर २०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. पावसाने विश्रांती घेताच पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत अमरावती विभागात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस झाला होता. विभागात १० जूननंतर मान्सूनचे आगमन झाले. सुरुवातीचे काही दिवस रिमझिम पावसानंतर गेल्या सात दिवसात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली, परिणामी जमिनीत ओलावा तयार झाला. पेरण्यांसाठी हा पाऊस अनुकूल मानला गेला आणि उघडीप पाहून शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामांना सुरुवात केली. विभागात १४ जूनपर्यंत १ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या असून शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे सर्वाधिक आहे.
गेल्या १ जूनपासून बुलढाणा जिल्ह्य़ात १९० मि.मी. (सरासरीच्या १३४ टक्के), अकोला जिल्’ाात २३३ मि.मी. (१७२ टक्के), वाशीम जिल्’ाात ३७३ मि.मी. (२२८ टक्के), अमरावती २२३ मि.मी. (१५२ टक्के) तर यवतमाळ जिल्’ाात २२७ मि.मी. (१२९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. विभागात साधारणपणे १२ दिवसांचा पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासापासून पश्चिम विदर्भात पावसाचा जोर ओसरला आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या विभागातील १५ तालुक्यांमध्ये तर सरासरीच्या २०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असून या तालुक्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्य़ातील जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, अकोला जिल्ह्य़ातील तेल्हारा, पातूर, वाशीम जिल्ह्य़ातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, अमरावती जिल्ह्य़ातील धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी, मोहगाव तालुक्यांचा समावेश आहे.
अमरावती विभागात खरिपाच्या सरासरी ३२ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १५ हजार हेक्टर (०.५ टक्के) क्षेत्रावर १४ जूनपर्यंत पेरणी झाल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले आहे, येत्या काही दिवसात पेरण्यांच्या कामांना वेग येईल, असा अंदाज आहे. विभागात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेली असली, तरी हे प्रमाण अत्यल्प आहे. जलाशयांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. शेतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांनी पूर्वमशागत आधी केली होती, आता पेरण्यांना एकाचवेळी सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत मजूर उपलब्ध होणे कठीण होऊन बसणार आहे.
विभागात यंदा गेल्या वर्षीपेक्षा तूर पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. पंरपरागत कपाशीच्या लागवडीत सातत्याने घट दिसून आली आहे. त्याची जागा सोयाबीनने घेतली आहे. विभागात सर्वाधिक क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाची अनियमतता आणि शेतमालाच्या किमतीतील चढउतार यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. तुरीला चांगले दर मिळाल्याने यंदा तुरीचे क्षेत्र वाढेल. विभागात मागणीच्या ७५ टक्के बियाणांचा आणि ४५ टक्के खतांचा पुरवठा आतापर्यंत करण्यात आला आहे.