थकीत करावर लावलेल्या व्याजाची सविस्तर लेखी माहिती मागितल्यामुळे खवळलेल्या महापालिका विभागाने बेसावध ठेवत घराची जप्ती केल्याचा आरोप सुरेश खेडीकर यांनी केला आहे.
सक्करदऱ्याच्या आयुर्वेदिक कॉलेज ते ताजबाग मेनरोडवर असलेल्या त्यांच्या घरावर थकित कर ४९,३८० रुपये होता. कर आणि व्याजाची रक्कम मिळून ७७ हजार ४६२रुपये खेडीकर कुटुंबाला भरायचे होते. त्यामुळे ४९,३८० या रकमेवर कोणत्याप्रकारे व्याज व दंड आकारण्यात आले आहे. याची सविस्तर महिती मिळवण्याकरता अर्जदाराने गेल्या महिन्यात नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्तांकडे लेखी अर्ज करून माहिती मागितली. माहिती न देता उलट द्वेष भावनेने घराची जप्ती सकाळी ९ वाजून १५ मिनिटाला केली. या कारवाईत तीन खोल्यांना सील ठोकण्यात आले. जप्तीचा पंचनामा, प्रपत्र आणि मेमो एकाचवेळी भिंतीवर चिटकवण्यात आल्याचे खेडीकर यांचे म्हणणे आहे.  नवीन वर्षांपासून जप्तीची नोटीस न देता तडकाफडकी नेहरू झोन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूडबुद्धीने ही कारवाई केल्याने कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे खेडीकरांनी तक्रारीत म्हटले आहे. थकित व्याज आणि दंडाची रक्कम कार्यालयीन वेळेत सहज भरणे शक्य होते. मात्र, ती कार्यालयीन वेळ न पाळता मुद्दाम सकाळी ही कारवाई करण्यात आली. जेणेकरून आम्हाला बँकेतून पैसे काढता येणार नाहीत. जप्तीचा पंचनामा केल्यानंतर त्यावर साक्षीदार म्हणून कोणीही सही केलेली नव्हती. त्याचे खेडीकरांनी फोटो काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र भोजराज बोबडे या व्यक्तीचे नाव व सही केलेली आढळली. त्याच्या छायाचित्राची प्रत खेडीकरांनी सादर केली. सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या नेहरूनगर झोनच्या कर आकारणी विभागाला न्यायालयात खेचणार असल्याचे खेडीकरांनी म्हटले आहे.