कोल्हापूर महापालिकेच्या विविध समित्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा शुक्रवारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापतिपदी राजू लाटकर, परिवहन सभापतिपदी राजू पसारे व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यावर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत सवाद्य मिरवणूक काढली.
कोल्हापूर महापालिकेच्या विविध विषय समितींच्या सदस्यांची वर्षभराची मुदत अलीकडेच संपली होती. नवीन निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सदस्यांची निवड करण्यात आली. तर चार दिवसांपूर्वी समितीच्या सभापती पदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली. त्याचवेळी प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडी बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले.
जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र यामध्ये केवळ औपचारिकता उरली होती. काही वेळातच प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी माने यांनी नूतन सभापती राजू लाटकर, राजू पसारे, सरस्वती पोवार यांचा सत्कार केला. या वेळी महापौर जयश्री सोनवणे, उपमहापौर सचिन खेडकर, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, उपायुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अश्विनी वाघमळे आदी उपस्थित होते.