गेली काही वर्षे सातत्याने ठरावीक नगरसेवकांनाच पालिकेतील महत्त्वाच्या पदांवर संधी देण्यात येत असल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी राहुल शेवाळे यांना दिल्याने, तर सभागृह नेतेपदी यशोधर फणसे यांना कायम ठेवल्याने शिवसेनेचे नगरसेवक आणि नगरसेविकाही संतप्त झाल्या आहेत. महिलांना संधीच मिळणार नसेल तर निवडणुकीतील ५० टक्के आरक्षणाचा फायदा काय, असा सवाल नगरसेविकांकडून विचारण्यात येत आहे. पालिका निवडणुकीनंतर शिवसेनेने वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी नगरसेविकांचा विचारच केला नाही. मागच्या पानावरून पुढे जाताना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ राहुल शेवाळे यांच्याच गळ्यात घातली. त्यावेळी पुढील वर्षी आपल्याला संधी मिळेल या आशेवर नगरसेविका मूग गिळून गप्प बसल्या. स्थायी समिती, बेस्ट समितीचे अध्यक्षपद किंवा सभागृह नेतेपदी महिलांना संधी मिळावी अशी मागणी गेल्या काही महिन्यांमध्ये नगरसेविकांकडून करण्यात येत होती. या वर्षी काही फेरबदल होतील अशी नगरसेविकांना अपेक्षा होती. परंतु राहुल शेवाळे यांना पुन्हा स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आल्यामुळे नगरसेविकांचा अपेक्षाभंग झाला आहे.
महापौर सुनील प्रभू, सभागृह नेते यशोधर फणसे आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे मार्गदर्शन करीत नाहीत. तसेच सभागृहात कोणत्या विषयावर काय आणि कसे बोलावे याबाबत माहिती देत नाहीत. सभागृहापूर्वी नगरसेवकांच्या बैठका घेत नाहीत. सभागृहात एखाद्या विषयावर कुणी बोललेच तर त्या नगरसेवक-नगरसेविकेला नंतर ‘समज’ देण्यात येते. मग आम्ही काम कसे करायचे, असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक-नगरसेविकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मार्गदर्शन करण्याऐवजी सभागृह नेते आपला पाणउतारा करतात. हा रॉगिंगचा प्रकार आहे, असा आरोप शिवेसनेच्या एका नगरसेविकेने काही दिवसांपूर्वी केला होता. सभागृह नेत्यांच्या या दबंगगिरीची त्यावेळी चौकशी करण्याऐवजी संबंधित नगरसेविकेलाच तंबी देऊन गप्प बसविण्यात आले. या प्रकारामुळे नव्याने महापालिकेत निवडून गेलेले नगरसेवक चक्रावून गेले. पालिकेतील शिवसेना नेत्यांबाबत साशंकता वाढू लागल्यामुळे सत्ताधारी अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेने युतीतर्फे पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांना रिंगणात उतरवले असून त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाच्या नगरसेविका ज्योत्स्ना दिघे निवडणूक  लढवित आहेत. तसेच शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे मनोज कोटक यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नगरसेवक शिवानंद शेट्टी रिंगणात उतरले आहेत.