महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे यांची निवड निश्चित मानली जात असून, अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत तांबे यांच्यासह मनसेचे किशोर शिंदे आणि भाजप-शिवसेना युतीचे हेमंत रासने यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केले.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (५ मार्च) होत आहे. त्यासाठीचे अर्ज शुक्रवारी दाखल करायचे होते. या मुदतीत तांबे, शिंदे आणि रासने यांनी
त्यांचे अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीतर्फे चेतन तुपे यांचेही नाव अध्यक्षपदासाठी
चर्चेत होते. मात्र, पक्षातर्फे फक्त तांबे यांचाच अर्ज आल्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे.
स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (६ सदस्य) आणि काँग्रेसचे (तीन सदस्य) मिळून नऊ सदस्य आहेत. मनसेचे तीन सदस्य स्थायी समितीमध्ये आहेत आणि भाजप (तीन सदस्य)-शिवसेनेचे (एक सदस्य) मिळून चार सदस्य आहेत. गेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. या वेळी मनसेच्या शिंदे यांनीही अर्ज दाखल केला असून काँग्रेस आघाडीकडे नऊ मतांचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे विशाल तांबे यांची निवड निश्चित मानली जात आहे.
स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी तयार केलेल्या चार हजार १६७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे काम आता तांबे यांच्याकडे अध्यक्ष या नात्याने येणार आहे.