जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा म्हणजे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा आधार असे मानले जाते. तेथे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, ही सर्वाचीच अपेक्षा असते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेने जि.प.च्या १ हजार ३९ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करून ही अपेक्षापूर्ती करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे ग्रामीण भागातील जि.प. शाळांच्या आवारांतही इंग्रजीचे उच्चार घुमू लागले आहेत.
स्पर्धेच्या काळात आपल्या मुलाने टिकून राहण्यायोग्य कौशल्य आत्मसात करावे, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे वळत आहे. हे जाणून उस्मानाबाद जि.प.ने यंदा प्राथमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी पहिलीपासून सेमी इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास सुरुवात झाली. आता जि.प.च्या प्राथमिक शाळांमधून चिमुकल्यांचा तोंडून इंग्रजी गाणी ऐकली की, हा निर्णय सुयोग्य असल्याचेच दिसून येते.
जूनमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. शाळांतील शिक्षकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, तत्कालीन शिक्षणाधिकारी अरुण व्हटकर, जि.प.चे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती संजय पाटील-दुधगावकर यांनी हा निर्णय राबविताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन दिशादर्शक नियोजन केले. प्रत्येक शाळेतील गरज, तेथील परिस्थिती, विद्यार्थिसंख्या, शिक्षकसंख्या लक्षात घेऊन त्यांनी सेमी इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला शिक्षकांना हा निर्णय पाठविणे अवघड गेले. मात्र, या मागील भूमिका समजावून घेतल्यानंतर त्यांचा काहीसा असणारा विरोध मावळला. प्रशिक्षणानंतर त्यांना या निर्णयाचे महत्त्व समजले आणि त्यांनी मनापासून या उपक्रमास प्रतिसाद दिला. केवळ एक-दोन नव्हे तर तब्बल १ हजार ३९ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांचे अ, आ, इ ऐवजी आता ए, बी, सी, डीचे बोल वर्गात घुमू लागले. जूनमध्ये सुरू झालेला हा उपक्रम किती दिवस चालणार, हा मुद्दाही बाजूला पडला. कळंब तालुक्यातील आंदोरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट दिली, तेव्हा इंग्रजी गाणी, इंग्रजी शब्दांचे पाठांतर ओघवत्या शैलीत ही मुले म्हणताना दिसली. एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांनी म्हणावीत तशी.
जि.प.चे उपाध्यक्ष दुधगावकर म्हणाले की, जगाच्या पाठीवर सध्या इंग्रजीची चलती आहे. या स्पर्धेत ग्रामीण भागातील मुले मागे पडू नयेत. त्यांनाही चांगले इंग्रजी यावे, हा प्रामाणिक हेतू ठेवून हा निर्णय राबविण्यात येत आहे. बदल्यांची प्रक्रियाही पारदर्शकपणे राबविल्याने शिक्षकांनी मनापासून हा निर्णय स्वीकारला. त्यामुळेच शाळेतील वातावरणात मुले समरस होऊन गेली. सध्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांनी या मागील भूमिका विशद करताना शिक्षकांना प्रोत्साहन दिल्याने त्यांनी मनापासून हा निर्णय राबविल्याचे सांगितले.
आंदोरा येथील शाळेतील वर्गशिक्षकांनीही आपले अनुभव सांगितले. सेमी इंग्रजी माध्यमासाठी शैक्षणिक साहित्यनिर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा फायदा झाला. मुलांनाही त्यांच्या घरात, आसपासच्या वातावरणात वापरले जाणारे शब्द इंग्रजीमधून शिकवण्यात आले. त्याचा त्यांना उपयोग झाला. कारण, दररोजच्या वापरातील शब्द शिकणे सोपे गेले. सहज एका मुलाला बोलते केले, तेव्हा त्याच्या तोंडून इंग्रजी शब्दाचे उच्चार, कविता-गाणी ऐकल्या, तेव्हा या निर्णयामागची उपयुक्तता बरेच काही सांगून जाणारी होती. ही एक प्रातिनिधिक शाळा आहे. तेथील मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.