नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या वतीने (निमा) स्थानिक संस्था कराविषयी मार्गदर्शनपर चर्चासत्र २३ मे रोजी दुपारी चार वाजता निमा हाऊस येथे आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात महानगरपालिकेचे स्थानिक संस्था कर उपायुक्त हरिभाऊ फडोळ, निमा कर उपसमितीचे अध्यक्ष मनोज पिंगळे, स्थानिक संस्था कर उपसमितीचे अध्यक्ष सतीश कोठारी हे मार्गदर्शन करणार आहेत.
२१ मेपासून महानगरपालिका क्षेत्रात शासनाने स्थानिक संस्था कर लागू केला असून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. शासनाने स्थानिक संस्था कर लागू केल्यापासून राज्यभर काही बाजूंनी सकारात्मक, तर काही ठिकाणी नकारात्मक भूमिका घेण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच उद्योजक, व्यापाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. त्याकरिता स्थानिक संस्था कर हा विषय विस्तृतरीत्या समजावून घेण्याकरिता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात स्थानिक संस्था कराची संकल्पना, नियम व कायदा, स्थानिक संस्था कर भरण्याची पात्रता, नोंदणीची पद्धत यांसह स्थानिक संस्था कराचे नियम व कायदे आदी विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
चर्चासत्रास सर्वानी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष कोठारी, सचिव सीएसके मेहता, सचिव मिलिंद चिंचोलीकर, खजिनदार प्रदीप बुब व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.